प्री वेडिंग शूटींग हवे की नको?

30 May 2023 22:36:20
Pre Wedding Shooting Ban Maratha Society

भारतीय संस्कृतीमध्ये १६ संस्कार आहेत त्यापैकी एक विवाह हासुद्धा संस्कार आहे. धर्मसमाज आणि नीतिमत्तेच्या दृष्टीने या संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतभर विवाहपद्धती निराळ्या असतील. मात्र, त्या पद्धतीचा अंतरंग एकच असतो. जो धर्मसंस्काराशी बांधील आहे. काही वर्षांपासून विवाहाच्या संदर्भात अनेक प्रथा नव्याने सुरू झाल्या. त्यापैकी एक प्री वेडिंग शुटिंग म्हणजे विवाहापूर्वीच भावी वधू आणि वराचे फोटो सेशन आणि शुटिंग करणे. प्री वेडिंग शुटिंगला अनेक समाजाने विरोध दर्शवला आहे.नुकताच मराठा समाजाच्या अनेक संघटनांनी प्री वेडिंग शुटिंगवर बंदी आणावी हा निर्णय समाजाने घ्यावा, असे आवाहन मराठा समाजाला केले आहे. याबद्दल समाज काय म्हणतो याची झलक म्हणजे हा संवाद

रिती भाती पंरपरांचे पावित्र्य राखणे महत्त्वाचे
सोलापूरमध्ये काही मराठा संघटनांनी लग्नापूर्वीच्या छायाचित्रणास शूटवर बंदी केल्याचे वृत्त ऐकले माझ्यावतीने या निर्णयाचे मी स्वागत करतो, हौसेला मोल नसले तरी मुल्य असलं पाहिजे. हौसेपोटी सामाजिक, सांस्कृतिक मुल्ये पायदळी तुडवली जाता कामा नये. अशा छायचित्रणामध्ये मर्यादा ओलांडल्या जातात. तसेच, बर्‍याचदा किल्ले, मंदिरे अशा पवित्र स्थानी उत्तानपणे छायचित्रण केल जाते हे अत्यंत चुकीचे आहे. मी सर्व समाजाला आवाहन करतो की, आपल्या प्रथा परंपरामध्ये घुसू पाहणार्‍या अशा चुकीच्या पद्धतींना आपण थारा देऊ नये. आपल्या रिती-भाती प्रथा पंरपरा यांचे पावित्र्य राखावे. समाज हा निर्णय स्वत:च घेईल.

अभय जगताप, ठाणे, भारतमाता सेवा प्रतिष्ठाण

प्री वेडिंग शूट घाणेरडी असंस्कृत प्रथा
प्री-वेडिंग शूटमुळे संपूर्ण समाजाची व आई-वडील यांची भयंकर बदनामी होत होती व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे अपेक्षितच नाही याची जाणीव प्रत्येक युवक-युवतीला असलीच पाहिजे. प्री-वेडिंग शूटच्या निमित्ताने बाहेर जाणे व तेथे काही भयानक प्रकारांमुळे बरेच लग्न मोडल्याच्याही घटना घडल्यात व मुलींना त्याचे बाधही लागले आहेत व त्या मुलींचे त्यामुळे आयुष्याचे नुकसान ही झालेले आहेत. त्यामुळे असल्या घाणेरड्या, अश्लील व असंस्कृत प्रकारांना समाजानेही वेळीच आवरणेही गरजेचे आहे.

डॉ. प्रसाद सोनवणे, नाशिक, संचालक, मराठा विद्या प्रसारक समाज

हा ज्याचा-त्याचा खासगी प्रश्न!
’प्री-वेडिंग शूट’ करावं की नाही हा सर्वस्वी वधू-वरांचा खासगी प्रश्न आहे. आपल्या समाजात आजही काटकसर करण्याची पद्धत आहे. त्यामुळे या शूटवर वारेमाप पैसे उधळले जातात हा आरोप काही योग्य नाही. ’प्री-वेडिंग’, ’मॅटरनिटी शूट’ हा ट्रेंड आठवणी जपून ठेवण्यासाठी म्हणून पाळला जातो. जोडप्याला आपल्या आयुष्यातील हे खास क्षण साजरे करण्याचा हक्क आहे. त्यावर सरसकट बंदी आणता येणार नाही.

पूजा पाटील, टेक्निकल इंजिनिअर, नवी मुंबई

प्री वेडिंग शूटवर अनाठायी खर्च नकोच
इतर वेळी लग्न कार्यातील धार्मिकता व त्यातील खर्च टाळून लग्न साध्या पद्धतीने साजरे करण्याचे सल्ले काहीजण देताना दिसतात. मात्र, प्री-वेडिंग शूटवर होणारा लाखो रुपयांचा अनाठायी खर्च त्यांना दिसत नाही. भारतीय संस्कृतीला घातक वळण देणार्‍या या प्री वेडिंग शूटला काही मराठा संघटनांनी विरोध केला. मराठा समाज हा नेहमी उज्वल भारतीय व महाराष्ट्राच्या परंपरांचा नेटाने पालन करणारा एक समाज आहे. समाज कधिही चंगळवादाचं समर्थन करत नाही. त्यामुळे कुण्या संघटनांनी सांगितले म्हणून नाही तर प्री-वेडिंग शूटवर अनाठायी खर्च नको हा निर्णय समाज स्वत:च घेईल.

सचिन सुभाषराव देशमुख, मराठा समाज सामान्य नागरिक, पुणे

प्री-वेडिंगच्या नावाने चाललेली अश्लीलता बंद करा!
प्री-वेडिंग फोटो शूटवर बंदी आणायलाच हवी. कारण, फोफावत चाललेली अश्लीलता. मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरूपयोग करत तरुण पिढी वाहवत जात आहे. याला कुठेतरी लगाम बसणे आवश्यक होते. प्री-वेडिंग शूटनंतर न पटणारी कारणे देऊन ठरलेली लग्न आधीच मोडण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे काही संघटनांनी सोलापूरमध्ये प्री वेडिंग शूटवर बंदी आणण्याचे जे आवाहन केले त्याला माझे समर्थन आहे. तसेही, समाजाचे हे आधीपासूनचेच मत आहे.

अश्विनी सचिन बोलके, पनवेल, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO)सदस्य

प्री-वेडिंग शूटवर बंदी म्हणजे दुर्दैवी प्रकार
प्री-वेडिंग शूटवर सरसकट बंदी आणणे हा निर्णय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात आजही लग्नसोहळे थाटामाटात करण्याची हौस वधुवरांमध्ये असते. ’प्री-वेडिंग’ हा त्याचा एक भाग झाला. या क्षेत्रात होणारी आर्थिक उलाढाल अनेक तरुणांना रोजगार देणारी आहेच. शिवाय, पर्यटनालाही चालना देणारी आहे. यानिमित्ताने अनेक वधु-वरासह संपूर्ण प्री-वेडिंगची टीम पार काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या ठिकाणांवर फोटोशूटसाठी जातात. बंदी आणल्यावर या क्षेत्रावरच अन्याय होईल.

निलेश पाटील, ग्राफिक डिझायनर,मुंबई


Powered By Sangraha 9.0