देशाच्या रक्षणास लष्कर सक्षम : सीडीएस जनरल अनिल चौहान

30 May 2023 15:01:21
CDS General Anil Chauhan

पुणे
: भारताशेजारील राष्ट्रांमधील राजकीय आणि आर्थिक अराजक, वेगाने बदलत असलेली भूराजकीय परिस्थिती, उत्तर सीमेवर वाढलेल्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचाली ही आजच्या परिप्रेक्षातील आपल्या समोरील नवी आव्हाने असल्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान म्हणाले. पीपल्स लिबरेशन आर्मी १९६२ पासून मागे हटलेली नाही. चीनसोबत संघर्ष टाळण्याचा आपला प्रयत्न आहे. भारताच्या सीमेवर अनुचित प्रकार घडू नयेत याची खबरदारी घेतली जात आहे. देशाचे रक्षण करण्याची पूर्ण क्षमता आणि सज्जता भारतीय लष्कराकडे असल्याचा विश्वासही त्यांनी दिला. भारतीय लष्करात नव्या तंत्रज्ञानाची उत्क्रांती होत असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४४व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा मंगळवारी खेत्रपाल मैदानावर पार पडला. यावेळी सीडीएस जनरल अनिल चौहान प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी इंदौरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (आयआयएम) संचालक हिमांशू राय, एनडीएचे प्रमुख व्हाइस डमिरल अजय कोचर, उपप्रमुख मेजर जनरल संजीव डोग्रा, एनडीएचे प्राचार्य ओ. पी. शुक्ला आदी उपस्थित होते. यावेळी चौहान म्हणाले, संचलन सोहळ्यात मुली देखील सहभागी झाल्याचे पाहून आनंद वाटला. मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या आहेत. झाशीच्या राणी प्रमाणे त्या देशाचे रक्षण करतील. भारतीय लष्करात देखील वेगाने बदल घडत असून लवकर तिनही दलांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. लष्कराच्या सशस्त्र दलांच्या थिएटरायझेशनच्या प्रक्रिये संदर्भात काम असल्याचे ते म्हणाले.

मणिपूरमधील आव्हाने संपलेली नाहीत. मणिपूरमधील आजची स्थिती दुर्दैवी आहे. दोन जातींमधील संघर्षातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही स्थिती केंद्र व राज्य सरकार योग्य रितीने हाताळतील. या स्थितीचा बंडखोरांशी संबंध नाही. २०२० साली तेथे लष्कर आणि आसाम रायफल्स तैनात असतानाच बंडखोरी नियंत्रणात आलेली आहे. आसाम रायफल्स आणि लष्कराने खूप चांगलं काम केलं आहे. मणिपूर मधील आव्हानं संपलेली नाहीत, असेही सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सांगितले.

प्रशिक्षणादरम्यान शैक्षणिक अभ्यासक्रमात उत्तम कामगिरी केलेल्या बीएस्सी शाखेत जसकरणदीप सिंग, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स (संगणकशास्त्र) शाखेत आयुष कुमार, कला शाखेत सौरव तर बी. टेकमध्ये ऋषभ मित्रा या कॅडेट्सने प्रथम क्रमांक पटकावला. सौरव, जसकरणदीप आणि आयुष हे पुढे डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून प्रशिक्षण घेत सैन्यदलात जाणार आहेत. तर, ऋषभ हा हवाईदल अकॅडमीमध्ये पुढील प्रशिक्षण पूर्ण करणार आहे. शाखा पदवी प्राप्त केलेले कॅडेट्स हे प्रामुख्याने, बी. एस्सी ८१, बी. एस्सी कॉम्प्युटर सायन्स ९०, बी. ए. ५९, बी. टेक १३७, असे एकूण ३६७ जणांनी पदवी प्राप्त केली आहे.

Powered By Sangraha 9.0