प्रत्येकवेळी थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार नाही - सरन्यायाधीश

03 May 2023 17:40:54
supreme-court-refused-to-hear-on-the-kerala-story

नवी दिल्ली
: ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाविरोधात दाखल विविध याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी प्रथम उच्च न्यायालयात जावे, असाही सल्ला देण्यात आला आहे.
 
लव्ह जिहादद्वारे दहशतवादाचे सत्य मांडणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लादण्याची विनंती करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात जमीयत उलेमा ए हिंद आणि कुर्बान अली यांनी दाखल केल्या आहेत. या याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकांवर तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली.

सुनावणीवेळी न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत. यावेळी सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड म्हणाले की, प्रत्येक मुद्द्यावर थेट सर्वोच्च न्यायालयातच सुनावणी होऊ शकत नाही. याचिकाकर्त्यांनी याविषयी प्रथम केरळ उच्च न्यायालयात दाद मागावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. त्याचवेळी केरळ उच्च न्यायालयाने चित्रपटाविरोधात दाखल याचिकांवर ५ मे रोजी सुनावणी करण्याचे निश्चित केले आहे.

दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील १० दृश्यांवर कात्री चालवली असून ‘प्रौढांसाठी’ या प्रमाणपत्रासह चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे.


Powered By Sangraha 9.0