पुणे : लावणी कलाकार गौतमी पाटील हिचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण करुन त्याची चित्रफीत समाजमाध्यमावर टाकणार्या दोघाजणांना विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या दोघांना सातारा जिल्ह्यामधून ताब्यात घेण्यात आले आहे.
आयुष अमृत कणसे (वय 21, रा. भरतगाववाडी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी गौतमी पाटील हिच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार केले होते. त्यावर तिचा कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ टाकून समाजात बदनामी केली होती. 24 फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये कार्यक्रम असताना हा प्रकार घडला होता. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर प्रसारीत झाला होता. गौतमीने याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रारदेखील दिलेली होती. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तिच्या कला पथकातील एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना कणसे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराविषयी माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या एका पथकाने सातार येथे जाऊन बुधवारी ही कारवाई केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता माळी, सहायक निरीक्षक अविनाश शेवाळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक संगीता माळी करीत आहेत.