दिशादर्शक ‘एनव्हीएस – ०१’ चे यशस्वी प्रक्षेपण

29 May 2023 18:26:29
NVS-01 Launched ISRO

नवी दिल्ली
: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने नेक्स्ट-जनरल नेव्हिगेशनल सॅटेलाइटचे सोमवारी यशस्वी प्रक्षेपण केले. ज्यामुळे समुद्रात जहाजांची रिअल-टाइम स्थिती आणि नेव्हिगेशनशी संबंधित अचूक वेळेची सेवा प्राप्त होणार आहे. दरम्यान, चांद्रयान ३ चे प्रक्षेपण येत्या जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली आहे.

इस्रोने आपला अत्याधुनिक दिशादर्शक उपग्रह एनव्हीएस - ०१ श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केला. त्यासाठी जीएसएलव्ही या रॉकेटचा वापर करण्यात आला. एनव्हीएस – ०१ हा भारतीय नेव्हिगेशन सर्व्हिसचा - ‘नाविक’चा दुसऱ्या पिढीतील पहिला उपग्रह आहे. उपग्रहांची एनव्हीएस मालिका प्रगत वैशिष्ट्यांसह ‘नाविक’ला आणखी बळकट करणार आहे.

या मालिकेत सेवा वाढवण्यासाठी एल १ बँड सिग्नलचा देखील समावेश आहे. एनव्हीएस - ०१ मध्ये प्रथमच स्वदेशी अणु घड्याळ बसवण्यात आले आहे. यापूर्वी शास्त्रज्ञ अचूक तारीख आणि ठिकाणाची माहिती निश्चित करण्यासाठी आयात केलेल्या रुबिडियम अणु घड्याळांवर अवलंबून होते. आता आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक उल्लेखनीय पाऊल टाकून इस्रोने या मोहिमेसाठी स्वदेशी बनावटीचे रुबिडियम अणु घड्याळ समाविष्ट केले आहे. 

Powered By Sangraha 9.0