निर्णय प्रक्रियेला वेग; राहुल नार्वेकर आयोगाकडून शिवसेनेची घटना मागवणार!

27 May 2023 12:00:14
 
Rahul Narvekar
 
 
मुंबई : पक्षाची घटना दोन्ही शिवसेना पक्षाकडून मागवण्याऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून मागवण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्यानंतर आता निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे.
 
विधीमंडळ आता पक्षाची घटना दोन्ही गटांकडून मागवण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाकडून मागवणार आहे. निवडणूक आयुक्तांकडे जुलै २०२२मध्ये नोंदवण्यात आलेल्या पक्षाची घटना विधीमंडळ मागवणार आहे. त्यानुसार खरी शिवसेना कोणती याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
 
सुप्रीम कोर्टाने शिवसेनेतील अपात्र आमदारांचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपावली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं की, आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही गटाकडून पक्षाची घटना मागवली जाईल, पक्ष घटनेनुसार चालतो की नाही हे देखील तपासलं जाईल, आणि त्यानंतर अपात्रतेबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र आता विधीमंडळ दोन्ही गटाकडून घटना न मागवता थेट निवडणूक आयोगाकडून पक्षाची घटना मागवण्याची शक्यता आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0