लोकशाहीचे मंदिर भारताच्या विकासाचा मार्ग बळकट करणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

27 May 2023 19:13:42
New Parliament house Narendra Modi

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज संसदेच्या नव्या वास्तूचे राष्ट्रार्पण होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये भारतीय परंपरेचे प्रतिक असलेला पवित्र सेंगोल पुनर्स्थापित करणार आहेत. भारताच्या संसदेच्या नव्या वास्तूचे राष्ट्रार्पण आज करणार आहेत. नव्या संसदेमध्ये सकाळी ७.१५ वाजेपासून राष्ट्रार्पण सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. नव्या संसदेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, हे लोकशाहीचे मंदिर भारताच्या विकासाचा मार्ग बळकट करत राहो आणि लाखो लोकांना सशक्त बनवत राहो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेविषयी सर्वसामान्य नागरिकांनी ट्विटर या समाजमाध्यमावर व्यक्त केलेल्या विचारांचेही कौतुक केले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनीदेखील नव्या संसदेची छायाचित्रे ट्विट केली आहेत. ते म्हणाले की, नवीन संसद भवनाची ही अप्रतिम झलक पाहून संपूर्ण देश आनंदित झाला आहे. ही संसद म्हणजे आपल्या संस्कृतीचे आणि आधुनिकतेचे अनोखे उदाहरण आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जुन्या आणि आता या नवीन संसद भवनात लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्याच्या उद्घाटनाबद्दल देशवासीयांमध्ये उत्साह आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

नव्याने बांधलेली संसद भवन एक मजबूत, अधिक विकसित राष्ट्र निर्माण करण्याच्या १.४ अब्जाहून अधिक भारतीयांच्या आकांक्षा आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे, असे ट्विट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. त्याचप्रमाणे, नवी संसद ही नव्या भारताची अभिव्यक्ती आहे. हे आपल्या लोकशाहीचे कार्य अधिक कार्यक्षम करते. ते आपली संस्कृती आणि वारसा प्रतिबिंबित करते आणि ते आपला आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्तेजित करते. नव्या संसदेच्या उद्घाटनाचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे, असे ट्विट परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केले आहे.

असा असेल उद्घाटन सोहळा :-

सकाळी ७.१५ – पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजेसाठी पोहोचतील

सकाळी ७.३० - महात्मा गांधी पुतळ्याजवळील मंडपात पूजेला सुरुवात होईल

सकाळी ९ - लोकसभा सभागृहात कार्यक्रमास सुरूवात

सकाळी ९.३० - संसदेच्या लॉबीमध्ये प्रार्थना सभा

दुपारी १२ – पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचतील

दुपारी १२.०७ - राष्ट्रगीत

दुपारी १२.१० - राज्यसभेच्या उपसभापतींचे स्वागत भाषण

दुपारी १२.१७ - दोन माहितीपटांचे प्रदर्शन

दुपारी १२.२९ - उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा संदेश राज्यसभा उपसभापती हरिवंश यांच्या हस्ते वाचून दाखविण्यात येईल, त्यानंतर राष्ट्रपतींचा संदेश

दुपारी १२.४३ – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे संबोधन

दुपारी १.०० - पंतप्रधान एक विशेष नाणे आणि मुद्रांक जारी करतील

दुपारी १.१० - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण

दुपारी १.३० – आभार – लोकसभेचे महासचिव


Powered By Sangraha 9.0