"याचिका का दाखल केली हे ओळखून आहोत! नशीब समजा दंड नाही लावला!", विरोधी पक्षांची याचिका फेटाळली!

26 May 2023 16:07:38
petition of opposition parties was rejected

नवी दिल्ली
: नव्या संसद भवनाचे येत्या रविवारी दित. २८ मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण कार्यक्रमावरून विरोधकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. विरोधी पक्षांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत. "याचिका का दाखल केली हे ओळखून आहोत! नशीब समजा दंड नाही लावला!", अशी टिप्पणी करत सुप्रीम कोर्टाने विरोधी पक्षांची याचिका फेटाळली.

दरम्यान, खंडपीठाने याचिकाकर्त्याला विचारले, “तुमचे उद्दिष्ट काय आहे? तुम्ही ही याचिका का दाखल केली हे आम्हाला माहीत आहे. आम्ही कलम ३२ अंतर्गत हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही. त्यावर याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली, न्यायालयाने तशी परवानगी दिली नाही. त्यामुळे विरोधी पक्षाला न्यायालयाने फटकारले.

कोर्टात केंद्र सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, “याचिका मागे घेण्यास परवानगी दिल्याने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे स्वातंत्र्य मिळेल. हे योग्य नाही. न्यायालयाने याची दखल घ्यावी.” बराच वेळ युक्तिवाद केल्यानंतर याचिकाकर्ता ती मागे घेण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आम्ही याचिका फेटाळून लावतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पणास विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात येत होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते की , नव्या संसद भवनाचे लोकार्पण हे राष्ट्रपतींच्या हस्ते झाले पाहिजे.


Powered By Sangraha 9.0