औरंगजेबाचे छायाचित्र शेअर केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

26 May 2023 07:50:40
case registered against youth for sharing picture of Aurangzeb

मुंबई
: मुघल आक्रमणकारी औरंगजेब आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवून उभे असलेले संभाजी महाराज या आशयाचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी एका शिवभक्तावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात हा प्रकार घडला आहे. शिवभक्तावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्यातील विविध भागांमधून या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथील सागर वानखेडे नामक युवकाने काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर औरंगजेबाशी संबंधित एक छायाचित्र शेअर केले होते. या छायाचित्रात संभाजी महाराजांच्या पायाशी पडलेला औरंगजेब आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेऊन उभे असलेले शिवाजी महाराज असे चित्र रेखाटण्यात आले होते. या विरोधात बोरगाव येथील अमीर शौकत शहा यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांत तक्रार देत या छायाचित्रांमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसात सागर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान, या घटनेवर राज्यातील शिवभक्तांकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ''छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत असून त्यांचे छायाचित्र समाज माध्यमांवर शेअर करणे हा गुन्हा कसा असू शकतो ? असा सवाल शिवभक्तांकडून विचारला जात आहे. संभाजी महाराज आणि औरंगजेबाचे छायाचित्र शेअर करणाऱ्या युवकावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात येऊ नये तसेच युवकावर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

निलंबनाबाबत स्पष्टता नाही

छायाचित्र प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून सिल्लोड ग्रामीणचे पोलीस अधिकारी असलेल्या सीताराम मेहेत्रे यांचे निलंबन झाल्याची माहिती समाज माध्यमांवर पसरवण्यात आली होती. याबाबत सिल्लोड पोलीस स्थानक आणि संभाजीनगर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून या बाबत कुठलेही स्पष्ट उत्तर प्राप्त झाले नाही. त्यामुळे अधिकाऱ्याचे निलंबन झाले की नाही याबाबत कुठलीही स्पष्टता होऊ शकलेली नाही.

Powered By Sangraha 9.0