ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचे देहावसान

    26-May-2023
Total Views |
Ravindra Vaidya passed away

महाराष्ट्र
: ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचे दि. २६ मे रोजी पहाटे साडेबारा वाजता जव्हार येथे देहावसान झाले. ९० व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. १७ फेब्रुवारी १९३३ रोजी जव्हार येथे थोर स्वातंत्र्यसेनानी काकी वैद्य आणि दत्तात्रय वैद्य यांच्या पोटी जन्मलेले रवींद्र वैद्य यांनी जुनी अकरावी उत्तीर्ण झाल्यावर मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये काही काळ नोकरी केली.

आदिवासींच्या विकासासाठी काहीतरी काम करावे, हा ध्यास घेतलेल्या रवींद्र वैद्य यांनी प्रजा समाजवादी पक्षाचे कार्य सुरु केले. त्यानंतर ते एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, प्रा. मधू दंडवते आदी नेत्यांच्या संपर्कात आले. दत्ता ताम्हाणे यांच्या प्रेरणेतून जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी या भागात आदिवासींच्या विविध प्रकारच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने उभारली.

रवींद्र वैद्य यांनी गोवा व दमण मुक्ती आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा ते सहभागी झाले. प्रज्ञा समाजवादी पक्षाचे कार्य करताना अंबरनाथ येथील साथी वसंतराव त्रिवेदी हेही त्यांचे सहकारी होते. त्यांच्या साप्ताहिक आहुति बरोबरच मुंबई येथील नवशक्ती दैनिकाचे बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी काम केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी दोन वर्षे कारावास भोगला होता.

आदिवासी भागात नाथादादा किंवा भाई वैद्य या नावाने ते ओळखले जात. गेल्या आठवड्यात ते एका कार्यक्रमासाठी मुंबई येथे आले होते. दि. २५ मे रोजी गुरुवारी त्यांची प्रकृती खालावली. त्यांचे सुपुत्र जव्हारचे माजी नगराध्यक्ष संदीप यांनी त्यांना जव्हार येथील कॉटेज रुग्णालयात दाखल केले. परंतु, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.