आता प्रधानमंत्री कुसुम-ब योजना महाराष्ट्रभर राबविण्यात येणार

26 May 2023 15:14:18
Pradhan Mantri Kusum-B Yojana maharashtra

महाराष्ट्र
: महाकृषि ऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुम-ब योजना महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे. या योजनेसंदर्भात राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत.  त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

दरम्यान , एमएनआरईने दि. २२ जुलै २०१९ रोजी पीएम-कुसुम योजनेसाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या होत्या. त्याचबरोबर दि. १३ जानेवारी २०२१ रोजी १ लाख सौर कृषिपंप व त्याचदरम्यान पुढच्याच महिन्यात आणखी १ लाख सौर कृषिपंप असे एकूण २ लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली. राज्य शासनाकडून दि. १२ मे रोजी २०२१ साली राज्यात सदर योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी १ लाख असे पुढील ५ वर्षांमध्ये ५ लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. सदर योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध होणार आहेत.

सौर कृषिपंप आस्थापनेचे उद्दिष्ट, पीएम-कुसुम योजनेच्या शासन निर्णयातील नमूद तरतूद, जिल्ह्याच्या ग्रामीण लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर पूर्ण करावयाचे आहे. महाऊर्जा मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्विकरण्यासाठी दि. १७ मे २०२३ पासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. महाऊर्जा मार्फत ऑनलाईन पोर्टल सुरु केल्यानंतर त्यास प्रचंड प्रतिसाद प्राप्त असून एकाच वेळी असंख्य शेतकरी अर्ज करण्याच्या प्रयत्नात असल्याने प्रक्रिया होण्यास विलंब होत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध नसल्यास, वाट पाहून कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा.

महाऊर्जाच्या खालील संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B योजनेची व ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट / फसव्या संकेतस्थळाचा वापर करु नये. आनॅलाईन पोर्टल सुरू केल्यापासून एकूण २३,५८४ अर्ज प्राप्त झाले असून जिल्हानिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे. महाऊर्जामार्फत सुरु केलेल्या ऑनलाईन पोर्टलचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. तसेच ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींसाठी ०२०-३५०००४५६ / ०२०-३५०००४५७ या दूरध्वनी क्रमांकावर आपण तक्रार नोंदवू शकता.

Powered By Sangraha 9.0