डाव्यांची लंगडी अभिव्यक्ती

    26-May-2023
Total Views |
National Film Institute pune

हिंदूंच्याच देशात हिंदूंच्याच लेकीबाळींवर होत असलेल्या अत्याचारांबाबत भाष्य करणार्‍या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला अद्याप विरोध सुरूच आहे. दिल्लीमध्ये जसे ‘जेएनयु’ हा डाव्यांचा गड मानला जातो, तसाच पुण्यामध्येही ‘नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट’ अर्थात ‘एफटीआयआय’मध्येदेखील डाव्यांचा तळ आहे. सहिष्णूतेच्या गप्पा हाणणार्‍या डाव्यांना ‘एफटीआयआय’मधील ‘द केरला स्टोरी’चे स्क्रिनिंग चांगलेच झोंबले. या स्क्रिनिंगला विरोध करतानाच ‘मीडिया ट्रायल’देखील केली गेली. परंतु, राष्ट्राभिमानी नागरिकांनी हा विरोध डावलून हिमतीने हे स्क्रिनिंग यशस्वी करून दाखवले. हा चित्रपट पूर्ण होईपर्यंत डाव्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवलेली होती. त्यांना पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्नदेखील केला. परंतु, मुळातच असहिष्णू असलेल्यांकडे सामंजस्याचा अभाव जाणवत होता. त्याउलट राष्ट्राभिमानी नागरिकांनी संघर्ष टाळला. देशभक्तीपर घोषणा देऊन आपला विचार अधिक स्पष्ट केला. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ‘एफटीआयआय’ची रितसर परवानगी घेण्यात आलेली होती. सर्व निमंत्रितांना पत्रिका देण्यात आलेल्या होत्या. सर्वांच्या नावांची नोंदणी केली जात होती. सर्वकाही नियमबद्ध पद्धतीने होत असताना पोटशूळ उठलेल्या डाव्यांनी आंदोलनाची भूमिका घेत आपल्या हिंदूविरोधी सर्वधर्मसमभाव आणि ‘टिपिकल सेक्युलॅरिझम’चे तुणतुणे वाजवायला सुरुवात केली होती. देशात घडत असलेल्या विघातक आणि विकृत घटनांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम करणार्‍या कलाकृतींना न्यायालयीन लढावी लागत आहे. वैचारिक विरोध सहन करावा लागत आहे. हे हिंदूविरोधी मानसिकतेचे लक्षण आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी ‘एफटीआयआय’मध्ये आल्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन तुमच्यासाठीही स्क्रिनिंगचे आयोजन करू, असे सांगितले. त्यांचे मुद्दे आणि भावना समजावून घेतल्या. आयोजकांसह दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी आंदोलकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यांना आंदोलन करण्याचा, विरोध करण्याचा अधिकार आहे. त्यांना तो करू द्या, अशी समंजस भूमिका घेतली. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी डाव्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार मान्य केला. परंतु, त्याच ठिकाणी, त्याचक्षणी डाव्यांकडून मात्र, उजव्यांचा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार नाकारला जात होता, अशा प्रकारचे लंगडे अभिव्यक्तिस्वातंत्र्य वैचारिक समतोल कशा प्रकारे राखू शकेल?

स्वातंत्र्यवीरमय पुणे...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर... या नावाने भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील लोकमान्य ते गांधी अशी कडी जोडलेली आहे. सावरकरांशिवाय भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. लिहिला जाऊ शकत नाही. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि ‘विवेक व्यासपीठा’च्या माध्यमातून ‘वीरभूमी परिक्रमा’ उपक्रमांतर्गत पुण्यात एकामागे एक अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल लागलेली आहे. कुठे पुस्तक प्रकाशन होते आहे, तर कुठे सावरकरांनी लिहिलेल्या गीतांचे कार्यक्रम होत आहेत. कुठे सावरकरांच्या नाट्यकृती साकारल्या जात आहेत, तर कुठे त्यांच्या कौटुंबिक संबंधांवर भाष्य करणार्‍या, प्रकाश टाकणार्‍या अभिवाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कुठे चर्चासत्र घेतले जात आहेत, तर कुठे सर्धा आयोजित केल्या जात आहेत. स्वा. सावरकर या नावाने मागील एक आठवड्यापासून पुणे भारून टाकलेले आहे. सर्वत्र सावरकर... सावरकर आणि सावरकर हीच चर्चा आहे. पुण्यासारख्या सामाजिक चळवळींचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास असलेल्या शहराशी सावरकरांचे जवळचे नाते होते. विदेशी कापडांची होळी असो... की फर्ग्युसनमधील त्यांचे वास्तव्य असो... लोकमान्यांशी असलेला त्यांचा स्नेह असो. सावरकरांविषयीच्या या स्मृतींना आणि जाज्वल्य देशाभिमान जागविणार्‍या त्यांच्या विचारांना पुन्हा एकदा या ‘वीरभूमी परिक्रमे’च्या माध्यमातून उजाळा मिळाला आहे. नव्या पिढीला नव्याने सावरकरांची कवी, नाटककार, लेखक, गीतकार, कादंबरीकार अशी ओळख झाली. काळ येईल आणि काळ जाईल पण अजोड देशभक्त, अपरिमित त्याग करणारे सावरकर काळाच्या कसोटीवर कायमच तेजाळत राहतील. या तेजस्वी सूर्याचा प्रकाश हिंदू समाजाला दिशा देत राहील. त्यामुळे ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत असे हे विविधांगी उपक्रम फक्त पुण्यातच नाही, तर इतरही सावरकरतीर्थांवर आयोजित करण्याची अनोखी संकल्पना मांडणारे राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आणि ‘विवेक व्यासपीठ’ यांचे शतश: आभार!

लक्ष्मण मोरे

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.