आषाढी वारीनिमित्त टोल वसुली पुढे ढकलण्याची गडकरींकडे मागणी : चंद्रशेखर बावनकुळे

26 May 2023 19:37:27
Chandrasekhar Bawankule letter to Nitin Gadkari

मुंबई
: महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची प्रस्तावित टोल वसुली प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय भूतल परिवहन मत्री नितीन गडकरी यांना केली आहे. यावर्षी आषाढी यात्रा २९ जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी या मार्गाने लाखो भाविक, वारकरी व त्यांची वाहने जाणार असल्याने या विनंतीकडे . गडकरी यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

पंढरपूर जवळील राष्ट्रीय महामार्ग ९६५ वरील पेनूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे टोल प्लाझा उभारण्यात आला असून त्यावर जून महिन्यापासून टोल वसुली प्रस्तावित आहे. ही टोल वसुली प्रक्रियाच पुढे ढकलण्याबाबत पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले आहे. जेणेकरून वारकरी व भाविकांना या राष्ट्रीय महामार्गाचा सुलभतेने वाहतुकीसाठी उपयोग करता येईल. भाविकांना या मार्गावरून प्रवास करताना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही व अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

यात्रेसाठी राज्य शासन व स्थानिक प्रशासनासह विविध विभागांकडून जय्यत तयारी करण्यात येते. भाविकांना कोणतिही अडचण होणार नाही यासाठी नागरिक व संस्था देखील मदतीला येतात. वारकरी व संबंधित संस्थानी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे टोल संदर्भात विनंती केली. त्याची प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तातडीने दखल घेत गडकरी यांना पत्र लिहिले.

महाराष्ट्राची परंपरा आषाढ वारी
 
आषाढी यात्रा ही महाराष्ट्राची परंपरा असून राष्ट्रीय महामार्ग ९६५ हा वारी मार्गावर आहे. या मार्गावरून लाखो वारकरी भाविक श्री विठ्ठल रुखमाई्च्या दर्शनासाठी वारी यात्रेच्या माध्यमातून प्रवास करतात. सुमारे सात लाख भाविक व त्यांची वाहने येथून जाणार आहेत. त्या सर्वांना दिलासा मिळावा यासाठी हे पत्र बावनकुळे यांनी लिहिले.


Powered By Sangraha 9.0