ग्वाम : जिथे अमेरिकेचा दिवस उगवतो!

Total Views |
Article on Guam America

ग्वाम? काय आहे हे? बामसारखं वाटतं आणि तिथे अमेरिकेचा दिवस उगवतो? म्हणजे नेमकं काय होतं? तिथे दिवस उगवतो, तेव्हा उर्वरित अमेरिकेत अंधार असतो की काय? सांगतो. सगळं व्यवस्थित, नीट सांगतो.

अलीकडेच आपले पंतप्रधान परराष्ट्रांचा दौरा करून आले. त्यावेळी ब्रिटन आणि अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांनी त्यांना मिठी मारली, तर पापुआ न्यू गिनीच्या राष्ट्रप्रमुखांनी त्यांना ’पाय लागू’ केलं. आपल्याकडे दक्षिण भारतात सार्वजनिक ठिकाणी वाकून नमस्कार केला जात नाही आणि केलाच तसा नमस्कार, तर पूर्णपणे कमरेत वाकून, समोरच्या व्यक्तीच्या पावलांना स्पर्श करून किंवा जोडलेले हात त्या व्यक्तीच्या अगदी पावलांजवळ नेऊन नमस्कार करतात. उत्तर भारतात सार्वजनिक ठिकाणीसुद्धा सर्रास वाकून नमस्कार करतात. मात्र, पूर्ण न वाकता अर्धवट वाकून समोरच्या व्यक्तीच्या फक्त गुडघ्यांना स्पर्श केला जातो. या क्रियेला बोली भाषेत ’पाय लागू’ असं म्हटलं जातं. पापुआ न्यू गिनीच्या राष्ट्रप्रमुखांनी आपल्या पंतप्रधानांचे स्वागत करताना असं ’पाय लागू’ केल्याचं दृष्य आपण बातम्या, वृत्तपत्रं किंवा समाजमाध्यमांवर पाहिलंच असेल. एका देशाच्या प्रमुखाने दुसर्‍या देशाच्या प्रमुखाचं राजनैतिक स्वागत करताना, अशी कृती केल्याचं कदाचित संपूर्ण आधुनिक जगातलं हे पहिलंच उदाहरण असेल. कुठे आहे हा देश पापुआ न्यू गिनी?

ग्वाम भाणि पापुआ न्यू गिनीबद्दल समजावून घेण्यापूर्वी आपल्या देशातली एक भयंकर जळजळ पण समजून घ्यायला हवी. चहा गरम असतो. म्हणजे असायलाच हवा. गरम चहा जिच्यात असतो ती किटली पण गरम असणारच. पण, चहा गरम आहे आणि किटली गरम आहे म्हणून किटली पकडायची फडकी पण गरम व्हायला लागली तर? तसं आपल्याकडे झालं आहे. म्हणजे नेहमीच तसं होतं. हस्तांदोलन करणं किंवा फार तर आलिंगन देणं, हे रूढ राजशिष्टाचार बाजूला सारून पापुआ न्यू गिनी देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चरणस्पर्श करून स्वागत केलं. यामुळे विरोधी राजकीय नेत्यांचा जळफळाट झाला, तर समजू शकतं. पाश्चिमात्य राजशिष्टाचाराऐवजी भारतीय किंवा खरं तर हिंदू राजशिष्टाचार पाळला म्हणून डाव्या विचारवंतांचा जळफळाट होणार, हेही समजू शकतं.

पण, भांडवलदारी वृत्तपत्रांत किंवा वाहिन्यांवर पगारी खर्डेघाशी किंवा तोंडाची वाफ दवडणार्‍या स्वघोषित विचारवंत पत्रकार-संपादक वगैरे मंडळींनी इनके आकांडतांडव करावं? जेम्स मारापे यांना मोदींच्या गुडघ्यांना म्हणजे पायांना स्पर्श करावा, असं वाटलं. कारण, त्या पायांच्या वर एक खंबीर हृदय आणि बुद्धिमान मस्तक आहे. तुम्हाला फक्त गुडघेच आहेत आणि ते ’ब्रेकिंग न्यूज’ देण्यापलीकडे धावत नाहीत, याला जेम्स मारापे काय करणार? असो. तर, आपल्या भारत देशाच्या आग्नेयेला इंडोनेशिया हा अनेक बेटांचा देश आहे. याची पूर्व बाजू हिंदी महासागरात आहे, तर पश्चिम बाजू प्रशांत उर्फ पॅसिफिक महासागरात आहे. इंडोनेशिया देशाचं सर्वांत पश्चिमेकडचं बेट इरियन जाया याचे दोन सरळ उभे भाग पडतात. पूर्वेकडचा भाग इंडोनेशियाचा, तर पश्चिम भाग म्हणजेच पापुआ न्यू गिनी हा देश.

पापुआ न्यू गिनीच्या पलीकडे अफाट, अमर्याद, अतिविस्तीर्ण असा पॅसिफिक महासागर पसरलेला आहे. या महासागरात अक्षरश: हजारो छोटी-मोठी बेटं आहेत. भौगोलिक ओळख या दृष्टीने जागतिक भूगोल शास्त्रज्ञांनी या बेटांचे समूह बनवून त्यांचे चार गट पाडले आहेत. त्यांची नावं आहेत - हवाई बेट, पॉलिनेशियन बेट, मेलनेशियन बेटं आणि मायक्रोनेशियन बेटे. यापैकी क्वचित काही बेटं स्वतंत्र देश आहेत किंवा क्वचित काही बेटं फ्रान्स, न्यूझीलंड या देशांच्या ताब्यात आहेत. पण, बहुसंख्य बेटांवर अमेरिकेची अप्रतिहत सत्ता चालते. आपण ‘पर्ल हार्बर’ हे नाव नक्कीच ऐकलं-वाचलं असेल. जपानने अमेरिकेच्या ‘पर्ल हार्बर’ या बंदरावर आकस्मिक विमानहल्ला करून बलिष्ठ अमेरिकन आरमाराचा भयंकर विध्वंस घडवून आणला होता.

हे ‘पर्ल हार्बर’ अमेरिकेत, म्हणजे अमेरिकेच्या मुख्य भूमीवर नाही, तर अमेरिकन मुख्य भूमीपासून हजारो किमी दूर अंतरावर पॅसिफिक महासागरात हवाई बेटांच्या समूहामधलं एक बेट होतं, आहे. तिथे अमेरिकेचा फार मोठा नाविक अड्डा होता, आजही आहे. पॅसिफिक महासागरातली ही असंख्य बेटं किंवा द्वीपसमूह पूर्वी स्पेन, पोर्तुगाल, ब्रिटन, फ्रान्स यांच्या ताब्यात होते. १९व्या शतकात अमेरिकेला एका फार द्रष्टा असा नाविक सेनापती लाभला. त्याचं नाव होतं आल्फ्रेड येयर मॅहॅन. स्पेलिंगनुसार नाव ’महान’, पण उच्चार करायचा ’मॅहॅन’ हा खरोखरच महान माणूस होता. त्याच्या आडाख्यांनुसार आपलं आरमार दल उभं करून अमेरिकेने नाविक सामर्थ्यात ब्रिटनवरही मात केली. आज अमेरिका ही निःसंशय जगातली सर्वोच्च नाविक महासत्ता आहे. अमेरिकेने हळूहळू पण निश्चर्यपूर्वक पॅसिफिकमधली असंख्य बेटे स्पेन, ब्रिटन इत्यादी युरोपीय नाविक सत्तांकडून स्वतःच्या ताब्यात आणली.

त्यापैकीच एक बेट ग्वाम. मायक्रोनेशियन द्वीपसमूहामधलं सर्वाधिक पश्चिमेचं बेट म्हणजे अवघ्या ४८ किमी लांबीचं आणि कुठे पाच किमी, तर कुठे १२ किमी रुंद असलेलं ग्वाम हे बेट. पापुआ न्यू गिनी देशाच्या सरळ उत्तरेला २ हजार, १९८ किमी अंतरावर असलेले एक बेट, पॅसिफिक महासागरातलाएक जमिनीचा ठिपका. पण, सैनिकीदृष्ट्या फार मोक्याचा. कारण, जपान, तैवान, चीन, दक्षिण कोरिया आणि फिलिपाईन्स हे सगळेच देश जवळ. म्हणून तर दि. ७ डिसेंबर, १९४१ या दिवशी जपानने ‘पर्ल हार्बर’वर आकस्मिक इंझावाती हल्ला चढवून अमेरिकन आरमाराची दाणादाण उडवली आणि दुसर्‍याच दिवशी म्हणजे दि. ८ डिसेंबर, १९४१ या दिवशी ग्वाम बेटावर ताबा मिळवून आपली आघाडी मजबूत केली. पुढची अडीच वर्ष ग्वाम बेट जपानच्या ताब्यात होतं. १९४२ ते १९४४ या कालखंडात अमेरिकेने जनरल डग्लस मॅकआर्थरच्या नेतृत्वाखाली पॅसिफिकमध्ये जपान्यांवर प्रचंड प्रतिहल्ला चढवला. आधुनिक सैनिकी इतिहासातल्या अत्यंत भीषण, कजाखी आरमारी लढाया या संपूर्ण सागरी पट्ट्यात अटीतटीने लढल्या गेल्या. अखेर अमेरिकेने बाजी मारली.

आज सत्तेच्या सारीपाटातले शत्रू-मित्र बदललेत. त्यावेळी जपान अमेरिकेचा शत्रू होता आणि चीन मित्र होता, तर आज फिलिपाईन्स, दक्षिण कोरिया, तैवान आणि जपान हे छोटे देश अमेरिकेचे मित्र आहेत आणि अवाढव्य चीन जबरदस्त प्रतिस्पर्धी आहे. चीन नाविक महासत्ता बनून एकट्या अमेरिकेलाच खिजवतोय असे नव्हे, तर त्याला संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रावरच ताबा मिळवायचा आहे. यामुळे सर्वाधिक धोका कुणाला असेल, तर तो ग्वाम बेटाला आहे. ग्वाम हे आज एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. तिथल्या सुंदर बाबूच्या पुळणींवर जपान आणि दक्षिण कोरियातून आलेल्या सधन पर्यटकांची पोरं धमाल दंगामस्ती करीत समुद्राशी खेळत असतात. त्याचवेळी बेटाच्या उत्तरेकडच्या अँडरसन वायूदल अड्ड्यावर ‘एफ-१५’ झुंजी विमानं आणि ‘बी-१’ बॉम्बफेकी विमानं गंभीरपणे ये-जा करीत असतात. तैवानी आणि अमेरिकन पर्यटक बाया ग्वाममधल्या ’ड्यूटी फ्री’ मॉल्समधून धूमधडाक्याने खरेदी करीत असतात; त्याचवेळी पश्चिमेकडच्या अपरा हार्बरमधून अमेरिकन आण्विक पाणबुड्या गुपचुप ये-जा करीत असताना अमेरिकन सैन्याची ’थाड’ क्षेपणास्त्र प्रणाली आणि पेट्रियट, क्रूझ इत्यादी आंतरखंडीय क्षेपणास्त्रं सज्ज असतात.

अमेरिकन नौदलाचं ’मरीन्स’ हे खास पथक नौदल अड्ड्याभोवती एखादा नवा रस्ता बांधून काढीत असतं. अमेरिकेने या संपूर्ण क्षेत्राला एक एकत्रित सैनिकी क्षेत्र बनवून नाव दिले आहे. ’इंडोपेकॉम’ म्हणजे ’इंडो-पॅसिफिक कमांड! आपल्याला माहीतच असेल की, भूगोल तज्ज्ञांनी पृथ्वीच्या मोजमापांसाठी पृथ्वीच्या गोलावर उभ्या आणि आडव्या काल्पनिक रेषा काढल्या आहेत. त्यातल्या उभ्या रेषांना म्हणतात रेखावृत (लाँगिट्यूड), त्यापैकी साधारण १८० अंशाच्या कोनातून उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव जी रेषा जाते, तिला म्हणतात ’आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा :- ’ इंटरनॅशनल डेट लाईन.’ ग्वाम हे या रेषेच्या अगदी जवळ आहे म्हणून गमतीने असं म्हटलं जातं की, अमेरिकेचा नवा दिवस सर्वप्रथम ग्वाम बेटावर उगवतो आणि अगदी याच कारणाने चीन जेव्हा तैवान किंवा अन्य कोणात्याही निमित्ताने अमेरिकेवर आक्रमण करेल, तेव्हा, पहिला हल्ला ग्वामवर होणार, हे सगळ्यांनाच स्पष्टपणे माहीत आहे.

२०२० मध्ये चीनने आपल्या नव्या ‘एच-६-के’ बॉम्बफेकी विमानांच्या मारक शक्तीची जाहिरात करण्यासाठी एक चित्रफीत प्रसारित केली. ही विमानं एका अनामिक शत्रू विमानतळावर हल्ला करताना दाखवली होती. चीनने जरी त्याला अनामिक म्हटलं असलं, तरी प्रत्यक्षात तो ग्वामचा अँडरसन हवाई अड्डा आहे, हे सगळ्यांनाच कळत होतं. चीनची नवी ‘डी एफ-२६’ क्षेपणास्त्र ही चार हजार किमी वर मारा करू शकतात. त्यांना तर उघडपणे ’ग्वाम किलर’ असंच नाव मिळाले आहे. अशा स्थितीत ग्वाम बेटाचा बंदोबस्त आणखी कडेकोट असला पाहिजे. चीनचा पहिला प्रहार आपल्या नौदल आणि वायूदलाने तितक्याच तडफेने झेलून परतवला पाहिजे, अशी ’इंडोपेकॉम’ सेनापतींचीसाहजिकच इच्छा आहे. यासाठी ग्वामवर तैनात असलेली शस्त्रसामग्री आणखी अद्ययावत केली पाहिजे, याबाबत ते आग्रही आहेत. पेंटेगॉन म्हणजेच अमेरिकन लष्करी मुख्यालयालाही ग्वामच्या संरक्षण सज्जतेची काळजी आहेच. त्यांनी या अद्ययावतीकरणासाठी तब्बल १५० कोटी डॉलर्सची रक्कम मंजूर केली आहे.

गंमत अशी आहे की, हे अद्ययावतीकरण करण्यासाठी प्रत्यक्षात जे विविध प्रकारचे सुटे भाग लागणार आहेत, ते असून प्रायोगिक अवस्थेत आहेत किंवा उत्पादन सुरू अशा अवस्थेत आहेत. ते येणार केव्हा आणि बसणार केव्हा?
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.