निसर्गाचा प्रेक्षक कलाकार : बापूसाहेब झांजे

    26-May-2023
Total Views |
Article on Bapusaheb Zanje

या लेखाचे नायक असलेले बापूसाहेब झांजे हे पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे कलाध्यापक म्हणून अनेक वर्षे कलाध्यापनात राहिलेले दृश्यकलाकार होय. चित्रकार, शिल्पकार अशी त्यांची दुहेरी ओळख. बापूंना मिक्स मीडियामध्ये विविध प्रयोग करण्याची आवड असल्याने ते कलासृजनाच्या क्रियेत विविध प्रयोग करीत असतात.

बीज रुजताना त्याला मोड येऊ लागतात. मोड येण्याची ही प्रक्रिया अनेक उंचवट्याने व बुडबुड्यांच्या समूहाने होते. त्याचे कोंबात रूपांतर होते व पुढे त्याचा वृक्ष होऊ लागतो. बीजाचे आवरण कितीही टणक असले, तरी त्याला फोडून बीजाची आंतरिक शक्ती आवरणापेक्षा अधिक दाबाने गोल गोट्यांचे, बुडबुड्यांचे आकार परिधान करून प्रसव होऊ लागते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जन्म घेणे, जगणे, नष्ट होणे व पुन्हा नव्याने जन्म घेणे... ही शृंखला अव्याहतपणे सुरू असते. हे सांगत असतानाच प्रयोगशील चित्रकार आणि शिल्पकार बापूसाहेब झांजे सांगत होते की, हीच शृंखला आणि त्या शृंखलेतील अवस्था, मी दृश्यकलेच्या माध्यमातून मांडलेली आहे. त्यासाठी दोन भिन्न स्वरुपाच्या माध्यमांचा वापर केला आहे. कॅनव्हॉस वर ‘सॉफ्ट पेस्टल’च्या साह्याने आणि काळा पाषाण (Black Basalt) या कठीण माध्यमातून हे नव्याने जन्म घेणारे बुडबुडे, उंचवट्यांचे आकार रेखांकित व शिल्पांकित करण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वतःला आलेले अनुभव, स्वतःच्याच शब्दांत अचूकपणे मांडण्यासाठीची किमया केवळ आणि केवळ प्रयोगशीलकलाकारच करू शकतो. कलाकाराने निर्माण केलेली कलाकृती ही कलाकाराच्या विचार प्रक्रियेची ‘आरसा प्रतिमा’ असते. कलाकाराच्या सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव आणि त्याची मानसिक स्थिती एकत्रितपणे एक कला निर्माण करते. जी कला म्हणून ओळखली जाणारी अभिव्यक्ती फुलवते. या लेखाचे नायक असलेले बापूसाहेब झांजे हे पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे कलाध्यापक म्हणून अनेक वर्षे कलाध्यापनात राहिलेले दृश्यकलाकार होय. चित्रकार, शिल्पकार अशी त्यांची दुहेरी ओळख. बापूंना मिक्स मीडियामध्ये विविध प्रयोग करण्याची आवड असल्याने ते कलासृजनाच्या क्रियेत विविध प्रयोग करीत असतात.

आपण एक निसर्ग आहोत, अशी त्यांची धारणा आहे. ते फार मनापासून तळमळीने सांगतात की, ‘’निसर्गात प्रत्येक घटक हा एकमेकांशी घट्ट जोडलेला असतो. आपल्या सर्व समस्या आणि समाधानाचा एक भाग.... आपणच असतो,” असे ते सांगतात. ’रूट्स मेक रूट्स’ या नियमानुसार आपण निसर्गाशी प्रामाणिक राहावयास हवे, असे ते सुचवू पाहतात. संवेदनशील मनाच्या आणि प्रयोगशील विचारांच्या सहयोगाने बापूंची प्रत्येक कलाकृती बनत असते. चित्रकार, शिल्पकार, क्युरेटर आणि लेखक अशी त्यांची स्थानिक ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. गेली चार दशके समकालिक दृश्यकलाकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. मानवी शरीर ही त्यांच्या कलाकृतीमध्ये वारंवार येणारी ‘थीम’ किंवा कल्पना आहे. बापूसाहेब हे दगडाला वाचतात, जोखतात. त्याची प्रकृती तपासतात. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते दगडावर काम करतात. अपारंपरिक आणि अद्वितीय समकालीन मोडमध्ये सामग्री वापरण्याचे नवनवीन मार्ग ते सातत्याने शोधत राहतात. हेच त्यांच्या दृश्यकला सृजनाचे वैशिष्ट्य ठरावे.

‘निसर्गाचा थेट प्रेक्षक’ म्हणून स्वत:ची भूमिका बजावणार्‍या बापूसाहेबांनी निसर्गाला स्वत:च्या शैलीत रेखाटलेले आहे. निसर्गाचा रंगमंच आणि पृथ्वीवरील जीवनमान यांचं साहचर्य सतत गतिमान ठेवण्यासाठी मूलभूत गरज म्हणून ‘उत्पत्ती’ची स्थिती आवश्यक असते, असे त्यांना वाटते. ही स्थिती त्यांना त्यांच्या सर्जनशीलतेचा एक महत्त्वाचा भाग वाटते. बापूसाहेब आपल्या सर्जनशील प्रयत्नांना पाठिंबा देणार्‍या शेक्सपियरच्या सॉनेटमधून तात्विकपणे उदृक्त करतात की, “मृत्यूच्या दिशेने प्रगती थांबवणे म्हणजे सध्याच्या पिढीच्या प्रकृतीच्या मागे जाणे.” अशाप्रकारे चित्रकार व शिल्पकार बापूसाहेब आपला अमूर्त आवाज विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. आपल्या काळातील लोकप्रिय शैलींचे पुनर्चित्रण करण्याऐवजी, बापूसाहेब निसर्ग आणि संपूर्ण ग्रहाच्या वास्तविकेतबद्दल विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी नवीन दृश्यकथा शोधण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे त्यांचे कलात्मक स्वातंत्र्य आणि व्यक्तिमत्व स्पष्ट होते.

गेल्या काही वर्षांत बापूसाहेबांनी अनेक स्मारकांची कामे केली आहेत. भारतातील आणि परदेशातील अनेक प्रतिष्ठित कॉर्पोरेट संग्रहांमध्ये त्यांच्या दृश्यकलाकृती आहेत. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन, बॉम्बेआर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, टिळक स्मारक ट्रस्ट, पुणे, ललित कला अकादमी, लखनौ, दक्षिण-मध्य विभाग, नागपूर, अशा विविध संस्थांनी त्यांच्या कला साधनेचे कौतुक केले आहे. एक कलाकार म्हणून बापू प्रत्येक माध्यम हाताळण्यात निपुण आहेत. त्यांची कामे केवळ कलेच्या निर्मितीमध्ये वापरलेल्या तांत्रिक कौशल्यानेच नव्हे, तर त्यांच्या चिंतेचा आवाज ऐकण्याच्या क्षमतेनेदेखील ओळखली जातात. त्यांची मोठ्या प्रमाणात आणि समृद्ध रंगीत चित्रे निसर्गाच्या सततच्या चालीरितीने स्पष्टपणे ते चित्रित करतात.

घोरेवाडी तालुका व जिल्हा धाराशीव येथे जन्मलेले बापूसाहेब एटीडी, लातूर आणि जी. डी. आर्ट (पेंटिंग) पुणे शिकलेले आहेत. दश एकलप्रदर्शने आणि अनेक समूह प्रदर्शनांद्वारे आपल्या सृजनात्मक कलाकृती प्रदर्शित करणार्‍या बापूसाहेबांना विविध स्तरांवरील सन्मान आणि पारितोषिके प्राप्त झाली आहेत. त्यांच्या कलाप्रवासाला आणि कलासृजनाला अनेक शुभेच्छा!

प्रा. डॉ. गजानन शेपाळ


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.