भारत-ऑस्ट्रेलियात ग्रीन हायड्रोजन टास्क फोर्स संदर्भात महत्वाचा करार!

26 May 2023 14:34:25
 
Green Hydrogen Task Force
 
 
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाढत्या संबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या महत्त्वपूर्ण विकासामध्ये, दोन्ही देशांनी स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी तसेच ग्रीन हायड्रोजन टास्क फोर्सच्या स्थापनेवर प्रमुख करार केले. सिडनी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज यांच्यात द्विपक्षीय बैठकीनंतर सामंजस्य करार झाला.
 
पंतप्रधान अल्बानीज यांनी या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया-भारत व्यापक आर्थिक सहकार्य करार पूर्ण करण्याची दोन्ही देशांची सामायिक महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करणे आणि अधिकाधिक व्यापार आणि गुंतवणूक सुलभ करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त, पंतप्रधान अल्बानीज यांनी बंगळुरूमध्ये नवीन ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावास स्थापन करण्याची घोषणा केली, जे ऑस्ट्रेलियन व्यवसाय आणि भारताच्या भरभराट होत असलेल्या डिजिटल आणि इनोव्हेशन इकोसिस्टममधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम करेल.
 
भारत-ऑस्ट्रेलिया संबंध परस्पर विश्वासावर आधारित आहेत. यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. त्यांच्या विधायक चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी खाण आणि खनिज क्षेत्रातील धोरणात्मक सहकार्य वाढवण्यावर भर दिला. दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी नव्या उंचीवर नेण्यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी, पंतप्रधान अल्बानीज आणि सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात येण्याचे निमंत्रण दिले.
 
ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर होणारे हल्ले आणि फुटीरतावादी घटकांच्या कारवायांचा मुद्दाही पंतप्रधानांनी उपस्थित केला. यापूर्वी त्यांच्या ऑस्ट्रेलियन समकक्षांशी चर्चा झाली होती आणि मीटिंग दरम्यान हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय होता. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना हानी पोहोचवणारा कोणताही घटक किंवा कृती स्वीकारली जाणार नाही, असं पंतप्रधान मोदींनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान अल्बानीज यांनी भविष्यातही अशा घटकांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0