आव्हानांनाच आव्हान देण्याचा माझा स्वभाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    25-May-2023
Total Views |
prime minister Narendra Modi

नवी दिल्ली
: आव्हानांनाच आव्हान देणे हा माझा स्वभाव आहे. संपूर्ण जग आज भारताकडे आशेने पाहत आहे. त्यामुळे त्यांचा आशा पूर्ण करण्याचे आव्हान भारताने स्विकारले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. जपान, पापुआ न्यूगिनी आणि ऑस्ट्रेलिया दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी मायदेशी आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज जग भारताची भूमिका ऐकण्यासाठी आतुर आहे. आमच्या मंदिरांवर होणारा हल्ला मान्य नाही, या आमच्या मतास सर्वोच्च महत्व दिले जाते. हिरोशीमाच्या भूमीवर म. गांधींचा पुतळा उभारून भारत जगाला शांतीची संदेशही देतो. जगातील सर्वांत जुनी संस्कृती, जुनी भाषा आणि जुनी परंपरा असलेल्या देशाकडून आज संपूर्ण जगाला अनेक आशा आहेत. त्या आशा पूर्ण करण्याच आव्हान भारतासमोर असून त्यामध्ये नक्कीच यश मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

नव्या संसदेच्या राष्ट्रार्पण सोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधी पक्षांनाही पंतप्रधानांनी नाव न घेता टोला लगाविला. ते म्हणाले, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानांनी भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणी ही अभिमानास्पद बाब आहे. मात्र, एवढेच नव्हे तर या कार्यक्रमास ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि विरोधी पक्षांचे खासदारही उपस्थित होते. या सर्वांनी मिळून भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

दिल्ली – डेहराडून वंद भारत एक्सप्रेसचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून रवाना केले. तसेच त्यांनी रेल्वेच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे लोकार्पण देखील केले आणि उत्तराखंड राज्याला १०० टक्के विद्युत कर्षण राज्य म्हणून घोषित केले. या रेल्वेमुळे गाडीमुळे देशाची राजधानी देवभूमी उत्तराखंडाशी जोडली जाणार असून या दोन शहरांमधील प्रवासाला लागणारा वेळ आता आणखी कमी होणार असल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदींचा निर्णय ऐतिहासिक – सी. आर. केसवन

भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू सी. आर. केसवन यांनी संसदेच्या नवीन इमारतीत ऐतिहासिक सेंगोल स्थापित करण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारताचा सांस्कृतिक वारसा आणि परंपरांची सखोल जाण असलेली व्यक्तीच अशा महत्त्वाच्या घटनेला इतिहासात योग्य स्थान मिळवून देऊ शकते. हा राजदंड आधी माउंटबॅटन यांना देण्यात आला होता, त्यानंतर पुजाऱ्यांनी त्यास गंगेच्या पाण्याने पवित्र करून पं. नेहरू यांच्याहाती सोपविला. या ऐतिहासिक घटनेची कोणालाच माहिती नव्हती. या राजदंडास पं. नेहरूंना देण्यात आलेली वॉकिंग स्टिक असे म्हणून अलाहाबाद संग्रहालयात ठेवण्यात आले होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.