'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक'चे विश्वविक्रमी आकडे!

    25-May-2023
Total Views |
 
Mumbai Trans Harbor Link
 
 
मुंबई :  मुंबई ते नवी मुंबई अंतर आता केवळ २० मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत मुंबई आणि नवी मुंबई शहराची जोडणी पूर्ण झाली आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत लोकार्पण करून तो जनतेसाठी खुला करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
  
 
 
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुंबई ट्रान्स हार्बर लिंकबद्दल विश्वविक्रमी आकडे समोर आणले आहेत. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक उभारण्याकरिता स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसाठी वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट म्हणजेच ९,७५,००० घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. बुर्ज खलिफाच्या ३५ पट उंचीच्या म्हणजेच सुमारे ३५ किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा प्रकल्पात वापर करण्यात आला आहे. शिवाय, १७ आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजे १,७०,००० मे. टन स्टीलच्या सळ्यांचा वापर करण्यात आला आहे.' 
 
 
 
'दक्षिण मुंबईला रायगडशी जोडणारी अखंड व थेट कनेक्टिव्हिटी. यामुळे मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे-द्रूतगती महामार्ग व मुंबई गोवा महामार्ग यामधील अंतर कमी होणार आहे. जगातील 10 व्या क्रमांकाचा व भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्र सेतू आहे. यामध्ये ऑर्थोट्रॉपीक स्टील डेक तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर करण्यात आला आहे. पृथ्वीच्या व्यासाच्या 4 पट म्हणजे 48,000 कि. मी लांबीच्या प्रिस्ट्रेसींग वायर्सचा वापर केला आहे. इंधन, वाहतूक खर्च व वेळेत 1 तासाची बचत होणार आहे. ओपन रोड टोलिंग सिस्टिम असलेला देशातला पहिलाच प्रकल्प असणार आहे.' अशी महत्त्वाची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे दिली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.