'शासन आपल्या दारी'द्वारे समाजातील शेवटच्या माणसापर्यंत लोककल्याणाची गंगा

    25-May-2023
Total Views |
Latur maharashtra shasan aplya dari

लातूर
: लातूर जिल्हा हा तीव्र उन्हाळ्याचा…एप्रिल आणि मे महिन्यात तर उन्हाचा चटका अधिकच वाढलेला असतो. या सगळ्या गोष्टींची जाणीव असलेल्या जिल्हा प्रशासनाने २२ मे रोजी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची जिल्ह्यातली सुरुवात औसा शहरात केली. तालुकास्तरीय कार्यक्रम असूनही नागरिकांचा प्रतिसाद मात्र अत्यंत उत्साही होता. कार्यक्रमस्थळी स्त्रियांची संख्या लक्षणीय होती.

शासनाच्या विविध विभागांचे ६० स्टॉल

जिल्हा स्तरावरून ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आणि त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याला वाटून दिलेल्या जबाबदारीमुळे अत्यंत चोख नियोजन झाले होते. शासनाच्या लोकहितकारी योजना राबविणाऱ्या महत्त्वाच्या विभागांनी आपले स्टॉल लावले होते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध योजनांची माहिती पत्रकं, विविध योजनासाठी लागणारे अर्ज, ऑनलाईन माहिती भरण्यासाठी किंवा ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यासाठीची सुविधा होती. या स्टॉलचे उदघाटन औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सर्व स्टॉलवर भेटी दिल्या.. अधिकारी, कर्मचारी यांच्यात माहिती सांगण्याचा उत्साह दांडगा होता.

मुख्य कार्यक्रमाची सुरुवात थेट लाभार्थींना लाभ देण्यापासून झाली. एकूण ७००९ लाभार्थींना विविध प्रकारचे लाभ देण्याचे नियोजन अत्यंत सुनियोजित पद्धतीने केले होते. थेट लाभ मिळत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता.

अवकाळी पाऊस आणि मदतीची तत्परता

मार्चमध्ये अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या नुकसानीची पालक मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ पाहणी केली. तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले. जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे केले. १० कोटी ७७ लाख रूपयाचा निधी शासनाने मंजूर केला, त्याचे वाटप झाले. एप्रिल मध्ये पुन्हा अवकाळी पाऊस त्यात वीज पडून व्यक्ती आणि जनावरांचे मृत्यू झाले. त्यावेळीही पालक मंत्री धावून आले, शेतकऱ्यांच्या भेटीला गेले. एप्रिल मध्ये औसा तालुक्यातील १६ जनावरं वीज पडून दगावली होती. त्यात दोन गायी, ५ म्हशी, ३ बैल, २ वासरे आणि ४ शेळ्यांचा समावेश होता. त्यात गाय आणि म्हशीसाठीची मदत ३७,५००/-, बैल प्रत्येकी -३२,०००/- वासरं प्रत्येकी २०,०००/-, शेळ्यासाठी प्रत्येकी ४,०००/- रुपये असे एकूण ४ लाख १५ हजार ५०० रुपयांचे धनादेश शेतकऱ्यांना ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात देण्यात आले.

औसा नगरपरिषदेकडून २३० दिव्यांग बांधवांना २ लाख ३० हजाराचे दिव्यांग सहाय्यता अनुदान देण्यात आले. शहरात घर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून ३५६ कुटुंबांना लाभ देण्यात आला. यावेळी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडून ट्रॅक्टर पासून ते ठिबक सिंचनपर्यंतचे लाभ देण्यात आले. महिला आणि बाल कल्याण विभागाकडून पहिल्यांदा गरोदर असलेल्या मातांना बाल संगोपन किट देण्यात आली. तसेच आर्थिक दुर्बल घटकातील मातांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी महिना २२००/- रुपये देण्याची योजना आहे, त्याचेही याठिकाणी वाटप करण्यात आले.

महसूली दाखले मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यात आले. औसा तालुका हा शेतरस्ते करण्यात राज्यात सर्वात आघाडीवर आहे सुमारे ४०० पेक्षा अधिक शेतरस्ते केल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीचे मार्ग निर्माण झाले आहेत, अशी भावना आमदार अभिमन्यू पवार यांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलून दाखविली. शेतकऱ्यांना विहीरीसाठी अनुदान दिले आहे. त्या शेतकऱ्यांनी ठिबक करुन फळबाग मोठ्या प्रमाणात लावावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच यासाठी शासन अनुदान देते असे सांगितले.

लाभार्थींच्या बोलक्या प्रतिक्रिया..

दुर्बल घटकातील महिलांसाठी राज्य शासनाने बालसंगोपन अनुदान सुरु केले असून ११००/- रुपये दरमहा मिळणारे अनुदान आता २२००/- रुपये मिळत आहे. औसा तालुक्यातील लखनगाव येथील ज्योती विजयकुमार कदम यांना दोन अपत्य असून त्यांना या कार्यक्रमात बाल संगोपन अनुदान मंजुरीचे पत्र देण्यात आले. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, त्या म्हणाल्या, माझ्या परिस्थितीमुळे मी मुलांना फारसं शिकवू शकले नसते पण आता हा आधार माझ्यासाठी मोठा आहे. मी माझ्या लेकरांना शिकवून मोठं करणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

शिवली येथील शेतकरी गोपाळ काळे यांचा शेतीपूरक दूधाचा व्यवसाय आहे, त्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी चाप कटर देण्यात आले. यामुळे माझा वेळ वाचणार असून माझ्या व्यवसाय वृद्धीसाठी हे गरजेचे होते, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली. खरोसा येथील शेतकरी बलभीम बिराजदार यांना ठिबक सिंचन अनुदान मंजूर झाले. यामुळे पिकाला पाणी देणे सुलभ होणार असून पिकाचा उतारा वाढण्यासाठी मदत आणि पाण्याचा अपव्यय टाळला जाऊन कमी पाण्यात अधिक भिजवा होणार असल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला.

एकूणच ‘शासन आपल्या दारी’ हा अत्यंत चांगला उपक्रम असून जनतेच्या हातात थेट लाभ जात असल्यामुळे मोठं समाधान लोकांमध्ये दिसून आले. येत्या शुक्रवारी, २६ मे रोजी उदगीर येथे तर २७ मे रोजी जळकोट मध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम होणार आहे. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळेल असा प्रशासनाला विश्वास आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.