खानसे ज्यादा जान प्यारी!

    25-May-2023   
Total Views |
Imran Khan Tehreek-e-Insaf political party

बुद्धीबळाच्या खेळात थेट राजाच्या गळ्यापर्यंत पोहोचण्याआधी त्याच्या आसपासचे प्यादे, वजीर यांचा खेळ खल्लास करावा लागतो. पण, पाकिस्तानी सरकार, सैन्य आणि ‘आयएसआय’ने उतावीळपणा दाखवत नेमकी उलट खेळी करण्याचा प्रयत्न केला. ‘तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) या पक्षाचे सर्वेसर्वा आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना मंगळवार, दि. ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातूनच पाकिस्तानी रेंजर्सने अटक केली. परिणामी, ‘पीटीआय’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांनी सार्वजनिक, खासगी मालमत्तेबरोबरच चक्क सरकारमधील मंत्री, सैन्याचे कमांडर यांच्या घरांनाही पेटवून दिले. पाकिस्तानमध्ये अशाप्रकारे एखाद्या नेत्याची अटक, त्याला शिक्षा सुनावली की, कार्यकर्त्यांचा भडका उडणे अपेक्षितच.

असे प्रकार यापूर्वीही घडले होतेच. परंतु, यंदा ‘पीटीआय’च्या कार्यकर्त्यांनी थेट लष्करी अधिकारी आणि आस्थापनांना लक्ष्य केले, जे यापूर्वी पाकिस्तानच्या इतिहासात कधीही घडले नव्हते. त्यामुळे पाकिस्तानी सरकारसह लष्करही पुरते हादरून गेले. इमरान खानची तुरुंगातून सुटका झाली खरी, पण देशभरात इमरान खान विरोधात १०० खटले अजूनही दाखल आहेत. तसेच, परवा शाहबाज सरकारमधील संरक्षणमंत्र्यांनी ‘पीटीआय’वरच बंदी घालण्याची भाषा केल्यामुळे, सध्या पाकिस्तानमधील परिस्थिती अधिकच चिघळली आहे. म्हणूनच सैन्य आणि सरकारच्या या ‘पॉवरगेम’मध्ये आपला, आपल्या पक्षाचा बळी जाणार, हे आता इमरान खान यांनाही कळून चुकले आहे. म्हणूनच त्यांनी सर्वोच्चन्यायालयाकडे याप्रकरणी हस्तक्षेपाची आणि न्यायाची आता विनवणी केली. पण, इमरान खान आणि त्यांच्या लष्करविरोधी कृत्यांमुळे अख्खी ‘पीटीआय’ची संरचनाच मुळापासून उखडण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने धडाकाच लावलेला दिसतो.

त्याअंतर्गत ‘पीटीआय’ची शीर्षस्थ नेत्यांची फळीच उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली असून, सर्वप्रथम पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री आणि खान यांच्यानंतरचे ‘पीटीआय’मधील दुसर्‍या क्रमांकाचे नेते शाह मेहमुद कुरेशी यांना अटक करण्यात आली. मात्र, ते तुरुंगाबाहेर आल्यानंतर पुन्हा एका प्रकरणाचा दाखला देत, त्यांना तुरुंगात डामण्यात आले. दुसरीकडे ‘पीटीआय’मधील नेत्यांच्या राजीनाम्याचे सत्र थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. माजी अर्थमंत्री असद ओमर, माजी माहिती आणि प्रसारणमंत्री फवाद चौधरी, माजी मानवाधिकारमंत्री शिरीन माजरी यांनीही ‘पीटीआय’ आणि इमरान खान यांच्याशी असलेेल्या संबंधांना ‘खानसे ज्यादा जान प्यारी!’ म्हणत पूर्णविराम दिला.

तसेच मोहम्मद मौलवी, आमीर कियानी, संजय सागवानी, डॉ. मुहम्मद अमजद, डॉ. इमरान अली शाह, पीर हसन यांसारख्या कित्येक नेत्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. त्यामुळे जीवंत राहायचे असेल, तर ‘पीटीआय’ सोडा किंवा तुरुंगात सडा, असा धमकीवजा इशारा देऊन पाकिस्तानी लष्कराने ‘पीटीआय’ हा राजकीय पक्षच मोडीत काढल्यात जमा आहे. तसेच, इमरान खान यांनाही लष्कराने जीवंत राहायचे असेल तर पाकिस्तानातून चालते व्हा, असा गर्भित इशारा दिल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात इमरान खान यांची पावलं इंग्लंडकडे वळतात की, इस्लामाबादेच्या कारागृहाकडे, हे पाहणे महत्त्वाचे.

‘पीटीआय’ या प्रमुख राजकीय विरोधाला नामोहरम करून पाकिस्तानी लष्कर आणि सत्ताधार्‍यांनी नेमका डाव साधला खरा. पण, आजचे सत्ताधारी असलेले पाकिस्तानी पीपल्स पार्टी, पाकिस्तानी मुस्लीम लिग (नवाझ) या पक्षांनीही इमरान खान सत्तेत असताना लष्कराच्या लोकशाहीमधील हस्तक्षेपावर ताशेरे ओढले होते. तसेच, आताचे हे सगळे इमरानविरोधक आगामी निवडणुकीत एकमेकांच्या गळेत गळे घालून लढतात की परंपरागत एकमेकांचे पुन्हा गळे पकडतात, तेही पाहणे रंजक ठरावे. तेव्हा, पाकिस्तानचे विचित्र राजकारण आणि त्यात गुरफटलेले लष्कराचे हितसंबंध यांचा हा गुंता कदापि सुटणारा नाही. त्यामुळे इमरान खान यांच्या जागी दुसर्‍या नेत्याचा आणि पक्षाचा उद्या पाकिस्तानात जरी उदय झाला तरी त्याची कालांतराने वाटचाल ‘पीटीआय’मार्गेच होईल, यात शंका नसावी. म्हणूनच पाकिस्तानला स्थैर्य, शांती, समृद्धीच्या मार्गावर न्यायचे असेल, तर या सर्वस्वी अपयशी ठरलेल्या राष्ट्राचे विसर्जन आणि विभाजन हाच त्यावरचा जालीम उपाय!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची