कर्मचारी निवड : कंपन्यांची बदलती भूमिका

25 May 2023 22:02:15
Employee Selection in Firms

आता कंपन्या उमेदवारांची निवड करताना त्यांची शैक्षणिक पात्रता व संबंधित कामाचा प्रत्यक्ष अनुभव याच्याच जोडीला त्याची मानसिकता व कार्यशैलीवर अधिक भर देत आहेत. यासंदर्भात ’लिंक्डइन’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, लहान-मोठ्या अशा विविध कंपन्या कर्मचार्‍यांची निवड करताना आता त्यांची मानसिकता व कार्यशैली यावर कटाक्षाने भर देत आहेत.

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यानंतर उद्योग -व्यवसाय क्षेत्र नव्याने स्थिरावले आहे. उत्पादन क्षेत्रासह मूलभूत सुविधा व त्याशिवाय सेवा क्षेत्राने या काळात सकारात्मक व्यवसायवाढीची सलामी दिली आहे. यामुळे एकूणच व्यवसायवाढीला विश्वासाचे पाठबळ मिळाले आहे. प्रस्तावित व्यवसायाची पूर्तता करण्यासाठी संबंधित कंपन्यांमध्ये विविध स्तरांवर व व्यावसायिक गरजांनुरूप कर्मचार्‍यांची निवड-नेमणूक सुरू केली आहे. मात्र, अशा नव्या कर्मचार्‍यांची निवड करताना विविध कंपन्या नवे आयाम आणि निकष वापरताना दिसत असून, ते अनेक अर्थांनी अभ्यसनीय ठरले आहेत.

नव्याने केलेल्या रोजगार सर्वेक्षणानुसार, कार्यालयीन वा संबंधित कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांच्या जागांमध्ये प्रदीर्घ काळानंतर सुमारे १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. अर्थात, जागांची ही संख्या व टक्केवारी कंपनी आणि त्यांच्या व्यावसायिक गरजांनुरूप वेगळी असली तरी त्यामुळे नजीकच्या भविष्यात नोकरी- रोजगार संधींच्या संदर्भातील कल अवश्य स्पष्ट होतो. तुलनेने अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान यावर आधारित कर्मचार्‍यांना सध्यातरी कमी मागणी आहे.

कर्मचारी निवड क्षेत्रात प्रामुख्याने काम करणार्‍या ‘एक्स्फो’ कंपनीच्या विशेषतज्ज्ञांनी यासंदर्भात केलेल्या अभ्यासानुसार, दरमहा कर्मचार्‍यांच्या निवड-नेमणुकीचे प्रमाण दरमहा सरासरी १५ टक्क्याने वाढत आहे. हे प्रमाण अर्थातच सर्व प्रकारच्या उद्योग - व्यवसायाचे परिचायक आहे. मासिक रोजगार संधींच्या आकडेवारीच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, दोन महिन्यांतील तुलनात्मक आकडेवारी २ लाख, २५ हजारांपासून २ लाख, ६० हजारांपर्यंत वाढलेली दिसून येते. अर्थात, आधीच्या उपलब्ध झालेल्या रोजगार संधी व कर्मचार्‍यांच्या निवडीच्या तुलनेत हे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमीच होते. उद्योग क्षेत्रशः सांगायचे म्हणजे सद्यःस्थितीत रिटेल, ग्राहकोपयोगी उत्पादने, पर्यटन व्यवसाय यांसारख्या व्यवसाय क्षेत्रातील रोजगार संधींमध्ये दरमहा सरासरी १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचे परिणाम कर्मचार्‍यांच्या निवडीमध्ये सक्रियपणे होत असल्याचे ‘एक्स्फो’च्या अभ्यास-अहवालात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे, हे विशेष.

प्रस्थापित पद्धत म्हणून कर्मचारी निवडीसंदर्भात प्रामुख्याने उपयोगात आणल्या जाणार्‍या व संगणकीय पद्धतीवर आधारित अशा ऑनलाईन निवड पद्धतीला मिळणार्‍या प्रतिसादाला यासंदर्भात कानोसा घेण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, सध्याच्या व्यवसाय - वाढीच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या नोकरी संधी वाढीचे प्रमाण लवकरच दरमहा २० टक्क्यांच्या वाढीपर्यंत जाऊ शकते. उद्योगांसह रोजगारवाढीच्या दृष्टीने ही बाब निश्चितच आशादायी ठरते. उपलब्ध रोजगार संधी व कर्मचार्‍यांची निवड यासंदर्भात उद्योग-व्यवसाय केंद्रांच्या भौगोलिक विश्लेषणानुसार, राज्यांच्या राजधानी व मेट्रो- महानगरांच्या तुलनेत चंदिगढ, वडोदरा, कोईम्बतूर, अहमदाबाद यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या प्रगत व व्यावसायिक शहरामधील उपलब्ध व अपेक्षित रोजगार संधी अधिक व वाढत्या संदर्भात राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही टक्केवारी पुरेशी बोलकी ठरते.

दरम्यान, बदलता काळ व वाढत्या व्यावसायिक गरजांपोटी विविध स्तरांवर कर्मचार्‍यांची निवड करताना विविध कंपन्या अधिकाधिक चौकस व चोखंदळ झाल्याचे दिसून येते. त्याचे परिणामही दिसून येत आहेत. याची जाणीव आता कंपनी, अधिकारी व अर्जदार-उमेदवार या उभयंतांना झालेली दिसून येते. बदलत्या स्थितीनुरुप यासंदर्भातील वस्तुस्थिती अधिकाधिक स्पष्ट होत आहे. यासंदर्भात झालेला मुख्य बदल म्हणजे, आता कंपन्या उमेदवारांची निवड करताना त्यांची शैक्षणिक पात्रता व संबंधित कामाचा प्रत्यक्ष अनुभव याच्याच जोडीला त्याची मानसिकता व कार्यशैलीवर अधिक भर देत आहेत. यासंदर्भात ’लिंक्डइन’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, लहान-मोठ्या अशा विविध कंपन्या कर्मचार्‍यांची निवड करताना आता त्यांची मानसिकता व कार्यशैली यावर कटाक्षाने भर देत आहेत. असे करण्यामागचे मुख्य व महत्त्वाचे कारण म्हणजे, अर्जदार त्यांची शैक्षणिक पात्रता व संबंधित कामाचा अनुभव त्यांच्या अर्जात नमूद करतात. विविध प्रकारच्या मुलाखती व संभाषणांतून त्याची पडताळणी घेतली जाऊ शकते.

मात्र, त्यातून उमेदवारांची कामाच्या संदर्भात व स्वभावविषयक मानसिकता लक्षात येते, असे नाही व हीच बाब निवड झालेल्या उमेदवाराने कामावर रुजू झाल्यावर त्याच्याकडून अपेक्षित प्रकारच्या कामाची व कार्यपद्धतीची पूर्तता होऊ शकेल अथवा नाही, हे स्पष्ट करू शकत नाही. ’लिंक्डइन’द्वारा यासंदर्भात प्रकाशित अभ्यासपूर्ण आकडेवारीनुसार, कर्मचार्‍यांची निवडपूर्व चाचणीद्वारे त्यांच्या मानसिकतेची पडताळणी आवर्जून केली जाते.आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड प्रक्रियेमध्ये अशी पडताळणी सुमारे ४० टक्के उमेदवारांची घेतली जाते, तर भारतीय कंपन्यांच्या संदर्भात हे प्रमाण तुलनेने अधिक म्हणजे ५० टक्के आढळून आले. उमेदवारांच्या मानसिकता चाचणीचे हे प्रमाण थोडे कमी-जास्त असले तरी अशा चाचणीच्या आवश्यकतेवर मात्र बहुसंख्य व्यवस्थापक व व्यवस्थापनाचे एकमत आहे. याच अभ्यासात आढळून आलेली अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, मानसिकता विषयक चाचणीद्वारा ज्या उमेदवारांची निवड केली गेली, असे उमेदवार केवळ मुलाखत-चर्चेद्वारा निवड केलेल्या उमेदवारांपेक्षा अधिक कार्यक्षम व उत्पादक असतात. यामुळेच या विशेष चाचणीबद्दल कर्मचारी-व्यवस्थापन आता विशेष आग्रही होऊ लागले आहे. केवळ पात्रताधारक नव्हे, तर गुणवत्ताप्राप्त कर्मचारी मिळण्याचे दुहेरी फायदे यानिमित्ताने होऊ लागले आहेत.

कर्मचारी कौशल्यविषयक ’लिंक्डइन’द्वारा प्रकाशित अन्य अभ्यासानुसार बदलती व्यावसायिक स्थिती भारतीय कंपन्यांच्या वाढत्या गरजा यामध्ये तुलनेने झपाट्याने व मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. यासंदर्भात प्रकाशित आकडेवारीनुसार, २०१५च्या तुलनेत नव्या कर्मचार्‍यांच्या कौशल्यविषयक गरजा सुमारे २९ टक्क्यांने वाढल्या असून २०२५ पर्यंत कर्मचार्‍यांच्या सध्याच्या कौशल्य टक्केवारीत सुमारे ४८ टक्के नवे बदल होणे अपेक्षित आहे. या बदलांच्या आलेखावरून कंपन्यांच्या नजीकच्या भविष्यात कर्मचार्‍यांची निवड करताना होणार्‍या मोठ्या बदलाची कल्पना येऊ शकते. मुख्य म्हणजे, जागतिक स्तरावर कर्मचारी कौशल्यांच्या बदलांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांच्या कर्मचारी कौशल्यांमध्ये अपेक्षित बदल तुलनेने मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.

भारतीय कंपन्यांच्या कौशल्य विषयक गरजांचे विश्लेषण केलेल्या विश्लेेषणपर अभ्यासानुसार, भारतात तेल कंपन्या, गॅस उत्पादन, खाणकाम या उद्योगक्षेत्रातील कर्मचार्‍यांमध्ये सुमारे ९.७ टक्के कौशल्यवाढ झाली आहे. वाहन वाहतूक, मालाची ने-आण वस्तूपुरवठा क्षेत्रात हेच प्रमाण १०.३ टक्के झाले आहे, तर रुग्णसेवा व पर्यटन क्षेत्रातील कर्मचारी कौशल्यवाढीचे प्रमाण सुमारे ११.३ टक्के दिसून आले आहे. असे होण्यामागे कर्मचारी निवड करताना कंपन्या सध्या शैक्षणिक पात्रताधारक असण्याबरोबरच कौशल्यपात्र उमेदवार असल्यावर भर दिला जात आहे. यातूनच उमेदवारांची मुलाखत-निवड करताना कर्मचारी निवडसंदर्भात आता ’कौशल्य प्रथम’ ही बाब अधोरेखित होत आहे.

दत्तात्रय आंबुलकर 
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६


Powered By Sangraha 9.0