मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी नव्या संसद भवनाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते केले जाणार आहे. याला काँग्रेससह अन्य १९ विरोधी पक्षांचा विरोध आहे. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणाऱ्या काँग्रेससह १९ विरोधी पक्षांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन संसदेचे उद्घाटन करावे अशी मागणी विरोधक करत आहेत.
यावर फडणवीस म्हणाले, "हे केवळ संसद भवन नाही तर 140 कोटी लोकांच्या श्रद्धेचे मंदिर आणि नव्या भारताच्या ताकदीचे प्रतीक आहे. राष्ट्रपतींनी उद्घाटन करावे असे विरोधक म्हणतात, मग इंदिरा गांधींनी संसदेच्या एनएक्स बिल्डींगचे उद्घाटन केले, तेव्हा तुम्ही बहिष्कार का नाही घातला? इंदिरा गांधींनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचं उद्घाटन केले, तेव्हा राज्यपालांच्या हस्ते का ते करण्यात आलं नाही? राजीव गांधींनी संसदेच्या लायब्ररीचं उद्घाटन केलं, तेव्हा राष्ट्रपतींची आठवण का करण्यात आली नाही? तामिळनाडुत तिथल्या विधानसभेचं उद्घाटन करताना राज्यपाल नव्हतेचं. नितीशकुमार यांनी बिहारच्या सेंट्रल हॉलचं उद्घाटन केलं, तेव्हा जेडीयु ने का बहिष्कार घातला नाही?"
"युपीए चं सरकार असताना मणिपुरमध्ये मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी विधानभवनाचं उद्घाटन केलं, तेव्हा राज्यपालांच्या हस्ते का ते करण्यात आलं नाही? तरुण गोगोई यांनी २०१४ मध्ये आसामच्या विधानभवनाचं उद्घाटन केलं, तेव्हा राज्यपालांना निमंत्रित देखील केलं नाही. २०१४ मध्ये झारखंड मध्ये हेमंत सोरेन यांनी त्या ठिकाणी विधानभवनाचं उद्घाटन केलं, तेव्हा राज्यपालांना निमंत्रित देखील केलं नाही. २०१८मध्ये आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचं उद्घाटन केलं, तेव्हा राज्यपालांच्या हस्ते का केलं नाही? २०२० मध्ये सोनिया गांधींनी छत्तीसगढच्या विधानवनाचं भुमिपुजन केलं, तेव्हा त्या कुठल्या सांविधानिक पदावर नव्हत्या. संसद सदस्य होत्या. तेव्हा या सर्व पक्षांनी बहिष्कार का टाकला नाही. ममता बॅनर्जीनी ज्युबली मेमोरियल बिल्डींगचं ज्यावेळेस उद्घाटन केलं, तेव्हा राज्यपालांना साध निमंत्रित देखील केलं नाही. अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा रिसर्च सेंटरचं उद्घाटन केलं, तेव्हा उपराज्यपालांना निमंत्रित देखील केलं नाही. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी विधानवनाचं उद्घाटन केलं, तेव्हा राज्यपालांना निमंत्रित देखील केलं नाही. त्यामुळे अशी अनेक उदाहरणे आहेत." असं म्हणत फडणवीसांनी अन्य १९ विरोधी पक्षांचा समाचार घेतला आहे.