यंदा परदेशी पाहुण्यांनाही घडणार वारीचे दर्शन

25 May 2023 19:21:09
Chandrakant Patil pune

पुणे
: जी-२० परिषदेअंतर्गत डिजिटल इकॉनॉमीफ गटाची बैठक ११ ते १३ जूनदरम्यान पुण्यात होणार असून, या कालवाधीत दोन्ही पालख्या पुणे येथे मुक्कामी आहेत. बैठकीसाठी २५ देशांचे प्रतिनिधींना या अनुषंगाने पाहुण्यांना आपल्या वारीच्या समृद्ध परंपरेचे, संस्कृतीचे दर्शन घडविण्याची संधी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. त्यासाठी पोलीसांकडून काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी.

विधान भवन पुणे येथे झालेल्या आषाढी वारी पालखी सोहळा-२०२३ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर ठेवावेत. पालखीच्या मार्गावर प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर पाणी, आरोग्य पथक, शौचालयांची व्यवस्था आदींसाठी मंडप (पेंडॉल) टाकण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागातही पालखी तळ आणि विसाव्याच्या दरम्यान अशी व्यवस्था करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले. पालख्यांच्या मार्गावरील रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात यावेत, पालखी प्रस्थानापूर्वी सर्व कामे पूर्ण करुन घ्या. हरीत वारी आणि निर्मल वारीसाठी सर्वांचा सहभाग घ्यावा. १० हजार वृक्षलागवडीचे नियोजन करा, असेही पालकमंत्री म्हणाले.

विभागीय आयुक्त राव यांनी वारी सोहळ्याबाबत केलेल्या नियोजनाची माहिती दिली. गतवर्षीपेक्षा टँकर, शौचालयांची संख्या वाढवली असून शौचालयांच्या स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. जेजुरी पालखी तळाच्या विकासाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, संत तुकाराम महाराज पालखी आणि संत सोपान महाराज पालखीसाठी मिळून दररोज २ हजार ७०० शौचालयांची पालखी मुक्कामी उभारणी करण्यात येणार आहे.
 
दुचाकीवरील ३९ आरोग्यदूत

दिवे घाटाची चढण झाल्यानंतर भाविकांना त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन झेंडेवाडी घाटात १० खाटांच्या विशेष आंतररुग्ण कक्षाची स्थापना करण्यात येणार असून कार्डियाक रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे. ङ्गडायल १०८फ सेवेच्या एकूण ३० आणि १०२ सेवेच्या एकूण ११० रुग्णवाहिका नियुक्त करण्यात आल्या असून दुचाकीवरुन सेवा देण्यासाठी ३९ आरोग्यदूत सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. ८७ बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके, ग्रामीण रुग्णालयाची आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची एकूण २४ पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे, ३३ औषधोपचार उपकेंद्रे, २ फिरते वैद्यकीय वैद्यकीय पथके अशी १४६ पथके आरोग्य सुविधांसाठी सज्ज करण्यात आली आहेत.

आषाढी वारी अ‍ॅप

आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये नागरिकांना आवश्यक माहिती व मदत मिळण्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. या अ‍ॅपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0