दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचा झेंडा

25 May 2023 19:10:25
BJP Rahul Kul APMC Daund

पुणे
: दौंड तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. या बाजार समितीच्या स्थापनेपासून ६० वर्षात पहिल्यांदाच भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे. समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे गणेश जगदाळे आणि उपाध्यक्षपदी शरद कोळपे विजयी झाले आहेत. पुणे जिल्ह्यात आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली दौंड बाजार समितीवर सत्ता मिळविण्यात भाजपला यश आले आहे. बाजार समितीचा मागील २३ वर्षांचा इतिहास पाहता पहिल्यांदाच दौंड बाजार समितीमध्ये कुल यांचा प्रवेश झाला आहे. बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १८ संचालक निवडून आले होते. राष्ट्रवादी आणि भाजपाचे प्रत्येकी नऊ सदस्य निवडून आले होते.

राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित संचालक संपत निर्माण निंबाळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे राष्ट्रवादीची एक जागा कमी झाली. दरम्यान, बाजार समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाकरिता निवडणूक लागली. गुरुवारी समितीच्या पदांकरिता निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीमध्ये भाजपाच्या जगदाळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बाळासाहेब शिंदे तर कोळपे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वर्षा मोरे या उमेदवार होत्या. जगदाळे आणि कोळपे या दोघांनाही प्रत्येकी नऊ मते मिळाली. तर, शिंदे आणि मोरे यांना प्रत्येकी आठ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे यांनी या दोघांना विजयी घोषित केले. आमदार राहुल कुल यांनी दोघांचाही सत्कार केला.
बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच हा बदल झाला आहे. हा पक्षाचा विजय आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, नियोजन, शेतकऱ्यांचा विश्वास यामुळे दौंड कृषी बाजार समितीमध्ये बदल घडविणे शक्य झाले.
राहुल कुल, आमदार
Powered By Sangraha 9.0