वसा शहर स्वच्छतेचा...

    25-May-2023
Total Views |
Article on Aniket Prabhu

पुण्याच्या अनिकेत प्रभू यांनी मागील एका तपापासून शहर स्वच्छतेचा वसा घेतला असून, त्यासोबतच इतरही स्वच्छतासंबंधीच्या कार्यात ते अग्रेसर आहेत. त्यांच्या कार्याचा धांडोळा घेणारा हा लेख...

शहराचे सौंदर्य वृद्धिंगत करायचे असेल, तर आपला परिसर, प्रभागापासून सुरुवात करायला हवी. हे हेरून सामाजिक कामाला सुरुवात केलेल्या अनिकेत प्रभू यांनी स्वच्छतेचा संकल्प केला. त्याचबरोबर वाहतूककोंडी, शहर विद्रुपीकरणास आळा, पर्यावरण, आरोग्य, खिळेमुक्त झाडे अशा अनेक कार्याची पुढे जोड मिळत गेली. गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेल्या या सामाजिक कार्यास आज असंख्य हात जोडले गेले असून, हे सेवाकार्य निरंतर सुरू आहे.

अनिकेत प्रभू यांचा जन्म चिंचवडचा. विद्यार्थीदशेत वृक्षारोपणापासून सामाजिक कार्यास त्यांनी सुरुवात केली. ‘बीसीए’, ‘एमसीएम’ शिक्षणानंतर नोकरी मिळण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, समाजकार्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. समाजासाठी व शहरासाठी काही तरी केले पाहिजे, या ध्यासातून त्यांनी या कामात उडी घेतली. १६व्या वर्षापासून किल्ले स्वच्छता मोहीम सुरू ठेवली असून, ती आजही कायम आहे. पुणे जिल्ह्यातील गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवणे, ध्वज बदलणे, पावसाळ्यात किल्ल्यांच्या परिसरात वृक्षारोपण करणे, अशी विविध कामे केली जातात. जिल्ह्यातील किल्ल्यांवर आलेल्या पर्यटकांना प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली. आजही अनिकेत प्रभू यांचे ‘रायरेश्वर किल्ले संवर्धन प्रतिष्ठान’ या माध्यमातून किल्ले संवर्धन सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड येथील थेरगाव परिसरातील मयूरबाग मित्रमंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही अनिकेत प्रभू यांनी मार्ग काढला. त्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न, यावर आवाज उठवून त्यांना न्याय दिला. आरोग्य शिबिरे, कौटुंबिक सहल, अनाथाश्रमास मदत, पोलीस व नागरिकांची आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध उपक्रम मंडळाच्या माध्यमातून ते राबवितात. स्वच्छता विषयावर काम करताना शहर स्वच्छतेची संकल्पनाही त्यांनी मांडली. शहर स्वच्छ होण्यापूर्वी आपला परिसर, आपला प्रभाग स्वच्छ असायला हवा, या विचाराने ‘थेरगाव सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून कामाला त्यांनी सुरुवात केली. पहिल्यांदा स्वतः रस्त्यावर उतरून यासाठी काम केले. पुढे या कामासाठी परिसरातील सामाजिक संघटना, संस्था, मंडळे एकत्र आली. दि. २० मे, २०१८ रोजी स्वच्छतेच्या कामापासून सुरुवात केली.

पुढे ‘आठवड्यातून दोन तास आपल्या थेरगावसाठी’ अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि आपल्या प्रभागासाठी दोन तास ते देऊ लागले. अगदी कचर्‍यापासून ते वाहतूककोंडीपर्यंत अनेक प्रकारचे विषय ते आजही सक्षमपणे हाताळत आहेत. पुढे प्रभागातील रस्ते, उड्डाणपूल यांच्या सुशोभीकरणाचे कामही त्यांनी केले. सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या जाहिराती व विद्रुपीकरण थांबविण्यास हातभार लावला. उड्डाणपुलाच्या खाबांवर लावण्यात आलेल्या जाहिराती काढून तेथे पुन्हा असे प्रकार होऊ नये, यासाठी महापालिकेची मदत घेतली. पोलिसांना वाहतूककोंडी सोडविण्यास मदत करणे, पालखी व इतर बंदोबस्तात त्यांना सहकार्य करणे, असे कामही केल्याचे प्रभू सांगतात.

महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची तपासणी केल्यानंतर ते अस्वच्छ आढळून आल्यानंतर ठेकेदराकडून ते स्वच्छ करण्यात आले. तसेच, परिसरातील एकही स्वच्छतागृहे अस्वच्छ राहू नये, याची दक्षता घेण्यास सांगितले. त्यानंतर वेळोवेळी फाऊंडेशनचे कार्यकर्ते यावर देखरेख करीत असतात. यातून पुढे शहरातील सर्व झाडांना लावण्यात आलेले खिळे, त्यावरील जाहिराती आणि जाळीत अडकून पडलेले वृक्ष मोकळे करणे यासाठी अभियान राबविण्यात आले होते. ‘आंघोळीच्या गोळी’ या संस्थेच्या मदतीने शहरात ‘खिळेमुक्त झाड’ या माध्यमातून शेकडो झाडांना मुक्त केले आहे. तसेच, जाळीत अडकून पडलेले व त्यालगतची साफसफाई हाती घेण्यात आली.

आजही अशा प्रकाराचे झाड अथवा विद्रुपीकरणातून परिसर मुक्त करण्यासाठी पावले उचचली जात आहे. दरवर्षी मैत्री दिनाचे औचित्य साधून झाडांना बॅण्ड बांधण्यात येतो. तसेच, सभासदांचा वा मित्रमैत्रिणीच्या वाढदिवसाला वृक्ष भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आजही कोणाचा वाढदिवस असल्याचे प्रभू त्यांना वृक्ष हमखास भेट देतात. पुढे, पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदी संवर्धन व प्रदूषण मुक्त करण्यासाठी अनिकेत प्रभू यांनी काम केले आहे. शहरातील घरगुती व अनेक कंपन्यांचे पाणी थेट पवना नदीपात्रात मिसळल्याचे आढळून आल्यानंतर त्यासाठी महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे पाठपुरावा केला, तर त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगून, वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला आहे.

नदीपात्रातील निर्माल्य, कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, जलपर्णी हे स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती. यात शेकडो टन कचरा पवनास नदीपात्रातून काढल्याचे प्रभू सांगतात, तर १ हजार, ७०० पेक्षा अधिक ट्रक जलपर्णी काढली आहे. नदीपात्रात अनेकदा मृत माशांचा खच आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, प्रशासन केवळ बघण्याची भूमिका घेते. मात्र, त्याचे कारण समजून येत नाही. यासाठी प्रभू यांच्या कार्यकर्त्यांनी नदीत नेमके कोठून प्रदूषित पाणी मिसळते, याचा अभ्यास केला. तसा अहवालाही त्यांनी महापालिकेस मध्यंतरी दिला होता. तसेच, पवना नदी स्वच्छ राहिला पाहिले, यासाठी ते अहोरात्र झटतात.

पंकज खोले 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.