‘सेंगोल’ हा स्वातंत्र्य आणि भारतीय परंपरेचे प्रतीक : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

    24-May-2023
Total Views |
new parliament house home minister amit shah

नवी दिल्ली
: भारताच्या स्वातंत्र्याचे प्रमुख सांस्कृतिक प्रतीक म्हणून १९४७ साली ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरित करणारा ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’ नवीन संसदेच्या इमारतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थापित करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या रविवारी संसदेच्या नव्या वास्तूचे राष्ट्रार्पण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी तामिळनाडूतील तिरुवदुथुराई मठातून आलेल्या अधिनामांकडून (पुजारी) ‘सेंगोल’ स्वीकारला होता. हा सेंगोल ब्रिटिशांकडून भारतीयांच्या हाती सत्तांतरीत करण्याचे प्रतिक होते, ते स्वातंत्र्याचे प्रतिक होते. त्यामुळे आज आपण जे स्वातंत्र्य बघत आहोत, ती घटना या पवित्र ‘सेंगोल’शी निगडीत आहे. मात्र, आज भारतीयांना या घटनेची माहिती नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळाचे प्रतिक म्हणून या पवित्र ‘सेंगोल’ची पुनर्स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

‘सेंगोल’ हा शब्द तमिळ शब्द सेम्माईवरून आला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते पुढे म्हणाले, या अर्थ धार्मिकता असा असून तामिळनाडूतील एका प्रमुख धार्मिक मठातील मुख्य अधिनाम (याजक) यांचा त्यास आशीर्वाद आहे. हा सेंगोलवर न्यायाचा निरिक्षक म्हणून नंदी असून ‘सेंगोल’ धारण करणार्‍या व्यक्तीला न्याय्य आणि निष्पक्षपणे राज्य करण्याचा आदेश याद्वारे प्राप्त होतो. हा सेंगोल १९४७ सालच्या सत्ता हस्तांतरणानंतर विस्मरणात गेला होता आणि अलाहाबाद येथील संग्रहालयात तो ठेवण्यात आला होता. मात्र, आता त्याचा पुनर्स्थापना करण्यासाठी नवी संसद हेच सर्वांत योग्य स्थान आहे. त्यासाठी त्यामुळे येत्या २८ मे रोजी १९४७ सालच्या सोहळ्याची पुनरावृत्ती होणार असून पंतप्रधान मोदी हा ‘सेंगोल’ स्विकारणार आहेत. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ हा सेंगोल ठेवला जाणार आहे, असेही अमित शाह यांनी यावेळी नमूद केले आहे.

असा आहे सेंगोलचा इतिहास

ब्रिटीशांनी भारताचे स्वातंत्र्य घोषित केले तेव्हा सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून ‘सेंगोल’चा वापर केला गेला. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी नेहरूंना १९४७ मध्ये सत्ता हस्तांतरणासंदर्भात एक प्रश्न विचारला, सत्ता हस्तांतरित कशी करावी. यानंतर नेहरूंनी सी. राजा गोपालाचारी यांचे मत घेतले. त्यांनी जवाहरलाल नेहरूंना ‘सेंगोल’बद्दल माहिती दिली. यानंतर ‘सेंगोल’ तामिळनाडूतून आणण्यात आला आणि त्यानंतर हा ‘सेंगोल’ सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनला.

चोल राजवंशाचा वारसा

‘सेंगोल’ इतिहास शतकानुशतके जुना आहे, तो चोल साम्राज्याशी संबंधित आहे. इतिहासकारांच्या मते, राजदंड ‘सेंगोल’ वापर चोल साम्राज्यात सत्ता हस्तांतरणासाठी करण्यात आला होता. त्या काळात, जेव्हा सत्ता हस्तांतरित झाली, तेव्हा विद्यमान राजाने सेंगोल दुसर्या राजाकडे सोपवले. ही परंपरा चोल साम्राज्यात सुरू झाली.  दक्षिण भारतातील राज्यांमध्ये याला विशेष महत्त्व दिले जाते.

संसद उभारणाऱ्यांचा सन्मान होणार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात संसदेच्या नव्या वास्तूची उभारणी विक्रमी वेळात पूर्ण झाली आहे. भारतीय परंपरा, संस्कृती आणि वारशाच्या पायावर नवभारताच्या उभारणीचे प्रतिक म्हणजे संसदेची ही नवी वास्तू आहे. या वास्तूच्या उभारणीमध्ये ६० हजार कामगारांनी आपले योगदान दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचाही सन्मान करणार आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.