'बजरंग दलावर बंदी घाला अन्यथा'... जमीयत उलेमा-ए-हिंदची काँग्रेसला धमकी!

24 May 2023 17:24:11
maulana-arshad-madani-demand-ban-on-bajrang-dal-congress-karnataka

नवी दिल्ली : जमीयत उलेमा-ए-हिंदने काँग्रेसला बजरंग दलावर बंदी घालण्याचे निवडणुकी आधी दिलेले आश्वासन पुर्ण करण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास आगामी निवडणुकीत मुस्लिमांचा पाठिंबा न मिळण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने बजरंग दलाची तुलना प्रतिबंधित कट्टरवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) सोबत केली . तसेच बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन ही कर्नाटकातील जनतेला दिले. मात्र, नंतर पक्ष मागे पडला आणि प्रत्येक जिल्ह्यात बजरंगबली मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले.

मात्र आता कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष सय्यद अर्शद मदनी म्हणाले की, कर्नाटकमध्ये ९० ते १०० टक्के मुस्लिमांनांनी काँग्रेसला मतदान केले आहे. त्यामुळे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने आपले आश्वासन पूर्ण करून बजरंग दलावर बंदी घालावी. अन्यथा येत्या निवडणुकीत मुस्लिम मतदार काँग्रेसवर विश्वास ठेवणार नाहीत.

तसेच मदनी यांनी स्वतंत्र भारतातील दंगलींसाठी काँग्रेसला जबाबदार ठरवले आहे. ते म्हणाले की, १९५६-५७ मध्ये जबलपूरमध्ये दंगली झाल्या होत्या. यानंतर देशभरात २० हजारांहून अधिक दंगली झाल्या. त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. एकाही दंगलखोराला शिक्षा झाली नाही. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे हे घडले.दरम्यान मदनी यांनी समान नागरी कायद्याला बहुमताचा कायदा असे म्हटले आहे. मुस्लिम आपल्या धर्माचा कायदा सोडून सरकारने बनवलेला बहुसंख्य कायदा मान्य करायला तयार नाहीत, असे ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0