लाकडी बांबू कामगाराचे लिव्हर-किडनी-फुफ्फुसे-आतड्या छेदून आरपार!

देवदूत बनून डॉक्टरांनी वाचवले प्राण

    24-May-2023
Total Views |
Kalyan building construction Accident

कल्याण
: अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका कामगाराला कल्याणच्या आयुष रूग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करत त्याला जीवनदान दिले आहे.‌ आपल्याकडे डॉक्टरांना देवदूत मानले जाते.‌त्याचा खऱ्या अर्थाने प्रत्यय या कामगाराला आला आहे.‌ आयुष रूग्णालयामधील डाॅक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे या कामगाराचा जीव वाचला असल्याने डॉक्टरांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इमारत बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारीवर काम करणाऱ्या एका व्यक्तीचा अंदाजे महिन्यांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. हा कामगार इमारतीचे बांधकाम सुरू असताना उंचीवरून खाली कोसळला. यावेळी टोकदार बांबू त्याच्या पोटाच्या उजव्या कुशीतून लिव्हर,किडनी ,आतडे आणि फुफ्फुसाला छेदून आरपार बाहेर निघाला. या अपघातात कामगार गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी इतर कामगार आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाने क्षणाचाही विलंब न करता या कामगाराला जवळच्याच आयुष रुग्णालयांमध्ये दाखल केले. आयुष रूग्णालयामधील डाॅक्टरांनी त्याच्यावर त्वरित उपचार सुरू केले.

रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवत तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रियाही केली. तब्बल ८ ते ९ तास चाललेली ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे सर्जन डॉ. शशांक पाटील, डॉ.अनिकेत वाळिंबे, डॉ. राजेश राजू आणि भूलतज्ज्ञ डॉ जितेंद्र बोबडे यांनी यशस्वीरित्या करत या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत प्राण वाचवले. तर शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. ज्याठिकाणी डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. विठ्ठल भिसे आणि अतिदक्षता विभागाततील आयसीयू टीमने प्रयत्नांची अक्षरशः पराकाष्ठा करत या कामगाराला नवीन जीवदान दिले. सध्या हा रुग्ण स्वतःच उठून बसत आहे, व्यवस्थित बोलत आणि खात असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

आयुष रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासनाने सामाजिक जाणीव ठेवत अतिशय माफक दरात उपचार केल्याची माहिती डॉ. राजेश राजू यांनी दिली. या उपचाराच्या खर्चापेक्षा आम्ही एका व्यक्तीचा जीव वाचवू शकलो याचे आम्हाला जास्त समाधान आहे अशी भावना आयुष रुग्णालयाच्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आतापर्यंत किचकट शस्त्रक्रियासाठी मुंबईकडे जावे लागत होते पण आयुष रूग्णालयामधील डाॅक्टरांनी हा शिक्का पुसून काढत जपलेले सामाजिक भान आणि जबाबदारी यांचे कल्याणकारांनी कौतुक केले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.