यु.आर.एल फाउंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा २९ मे ला रंगणार

    23-May-2023
Total Views |

tatya lahane 
 
मुंबई : सामाजिक भान जपत अनेक मान्यवरांनी आजवर आपली समाजाप्रती बांधिलकी जपली आणि जोपासली. समाजातील अशा मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या कार्याप्रती ‘कृतज्ञता’ व्यक्त करण्यासाठी यु.आर.एल फाउंडेशन तर्फे दरवर्षी २९ मे ला ‘कृतज्ञता दिवस’ साजरा करण्यात येतो. यु.आर.एल फाउंडेशनचे अध्यक्ष उदयदादा लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान यादिवशी करण्यात येतो. यंदाचा २०२३ चा सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा सोमवार २९ मे ला शिवाजी मंदिर नाट्यगृहात सायं. ६.०० वा. रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला अध्यक्ष म्हणून पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने उपस्थित राहणार आहेत.
 
डॉ. श्री शैलेश श्रीखंडे (प्रसिद्ध कर्करोग तज्ञ), डॉ. प्रीतम सामंत (प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ), डॉ. अमोल भिंगार्डे (जनरल फिजिशियन) आणि अभिनेते सयाजी शिंदे (कलाकार आणि वृक्षप्रेमी) आदि मान्यवरांना याप्रसंगी सन्मानित करण्यात येणार आहे. रुपये १ लाख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यासोबत अ.नि.स.चे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा यांना रुपये १ लाखाचा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. रामदास फुटाणे, अशोक नायगांवकर, अरुण म्हात्रे, साहेबराव ठाणगे, महेश केळुस्कर , नारायण पुरी (नांदेड), गुंजन पाटील (औरंगाबाद),भरत दौंडकर (शिरुर) आदि कवींच्या कवितांची शानदार मैफिल या पुरस्कार सोहळ्या दरम्यान रंगणार आहे. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.