मुंबई (प्रतिनिधी): कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची एकामागोमाग एक मृत्युच्या घटना समोर येत असतानाच आता आणखी एका पिल्लाचा ही मृत्यु झाला आहे. ज्वाला या मादी चित्त्याने गेल्या महिन्यातच चार पिल्लांना जन्म दिला होता, त्यापैकी एका पिल्लाचा आता मृत्यु झाल्याचे समोर आले आहे.
या पिल्लाच्या मृत्युचे कारण शोधण्यासाठी अद्यापही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तपास सुरु आहे. गेल्या तीन महिन्यात तीन चित्ते आणि आता आणखी एक पिल्लु अशा चार चित्त्यांचा मृत्यु झाला असुन याबाबत संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. साशा या मादी चित्त्याचा मार्चमध्ये किडनी फेल्युअरमुळे मृत्यु झाला. त्यानंतर, उदय या नर चित्त्याचा ह्रदयविकारामुळे तर, दक्षा या मादी चित्त्याचा वीणीच्या वेळी नर आक्रमक झाल्यामुळे मृत्यु झाला.
दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातुन आणलेल्या एकुण २० चित्त्यांपैकी १७ पुर्ण वाढ झालेले चित्ते आणि ३ पिल्ले शिल्लक आहेत. या चित्त्यांचा एकामागोमाग एक मृत्यु होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.