३० जूनपासून बाईपण भारी देवा सर्व चित्रपटगृहात

23 May 2023 13:08:29
 
मुंबई : केदार शिंदे यांच्या 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर लगेच त्यांचा पुढचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एप्रिल महिना अखेरीस या चित्रपटाचा पहिला टिझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आज चित्रपटाचा टिझर आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर करत केदार शिंदे त्यांनी ३० जून पासून सर्वांनी चित्रपट पाहावा असे आवाहन केले आहे.
 

baipan bhari deva 
 
'बाईपण भारी देवा' आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे.
 
चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
 
या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. 'बाईपण भारी देवा' हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करणार असल्याचे दिसून येते.
Powered By Sangraha 9.0