मनस्वी चित्रकार, यशस्वी अभियंता

23 May 2023 22:07:53



article on Siddharth Dharne

सिद्धार्थ धारणे संगणक अभियंता. मात्र, आज प्रतिथयश चित्रकर्मी म्हणून तो ओळखला जातो. चित्रकलेचे कुठलेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या या मनस्वी चित्रकर्मीच्या सप्तरंगी कलाप्रवासाचा ‘कॅनव्हॉस’...

सिद्धार्थ धारणे त्र्यंबकेश्वरचा. वडील छायाचित्रकार वडील रवींद्र धारणे व आई ज्योती हे दोघेही कलाप्रेमी. रेघोट्या ओढणार्‍या अन् रंगाशी खेळणार्‍या आपल्या मुलाला त्यांनी बालपणापासूनच प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले. सिद्धार्थ लहानपणापासूनच चित्र काढत. यामुळेच सिद्धार्थाच्या कलागुणांना वाव मिळाला. टीव्हीवरील कार्टून, निसर्ग, प्राणी, पक्षी, फुले यांचे तो अप्रतिम रेखाटन करत. २००५ मध्ये, आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेत असताना अ. भा. जल साहित्य संमेलनातील चित्रकला स्पर्धेत त्याने राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक मिळवले. पुढे एका वृत्तपत्राच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सलग दोन वर्षे त्याने राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली.

‘ब्रह्मा व्हॅली पॉलिटेक्निक’मध्ये पदविकेचे शिक्षण सुरू असताना सिद्धार्थने ‘एचएएल’ व ‘अ‍ॅरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया’ यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक मिळवला. पुढे महाराष्ट्र राज्य वनविभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत त्याने सलग पाच वर्षे पारितोषिकांवर नाव कोरले. आजपर्यंत तीन राष्ट्रीय, आठ राज्य व १३ जिल्हास्तरीय परितोषिकांवर त्याच्या नावावर आहेत. २०१४ मध्ये सिद्धार्थने व्यावसायिक चित्रकार म्हणून कामे घेण्यास सुरुवात केली. नाशिक येथील एका ‘विनियार्ड’ने आयोजित केलेल्या व्यावसायिक चित्रप्रदर्शनात त्याने सहभाग घेतला. तिथूनच त्याला व्यावसायिक चित्रकार म्हणून कामे मिळण्यास सुरुवात झाली.

आजपर्यंत सिद्धार्थने २० व्यावसायिक चित्रप्रदर्शने केली. त्यापैकी १२ वैयक्तिक तर आठ ही सामूहिक होती. पहिल्याच चित्रप्रदर्शनामध्ये सिद्धार्थची चित्रे पाहून एका कलादालनाचे निमंत्रण मिळाले. तिथे त्याने आपली काही चित्रे ठेवायला प्रारंभ करताच, तिथे चित्रांना मागणी येत गेली. ‘नमो बुद्धाय’, ’माऊली’ ही त्याची प्रसिद्ध चित्रे येथूनच चित्रप्रेमींनी विकत घेतली. पार्श्वगायक डॉ. सलील कुलकर्णी, गायक संगीतकार श्रीधर फडके, ‘इन्फोसिस’चे उपाध्यक्ष सी. एन. रघुपती अशा अनेक नामवंत व्यक्तींनी त्याच्या चित्रप्रदर्शनांना भेटी देत त्याचे कौतुक केले आहे.

१९५० मधील त्र्यंबकेश्वर मेनरोड येथून वाहणार्‍या गोदावरी नदीच्या स्थितीवर भाष्य करणारे ‘द लॉस्ट रिव्हर’ हे त्याचे चित्र. “मध्यंतरी गोदावरी स्वच्छता आंदोलन टिपेवर होते. प्रकरण हरित लवादाकडे पोहोचले. पूर्वी गोदावरीवर स्लॅब नव्हता. चित्रामध्ये अशीच नदी दाखवली. त्यावेळी हे चित्र अनेक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध आले. त्यानंतर एका प्रदर्शनात चित्र ठेवले आले असता एका नामांकित आर्किटेक्टनेे ते खरेदी केले. ते या चित्राचा शोध गेले अनेक दिवस घेत होते,” असे सिद्धार्थ या चित्राबद्दल सिद्धार्थ सांगतो. चित्रकलेत केलेल्या कलाकृतींबद्दल सिद्धार्थला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहेत. त्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील ‘गंगा गोदावरी’ पुरस्काराने त्याचा दोन वेळा सन्मानित करण्यात आले, असा पुरस्कार प्राप्त करणारे तो सर्वांत तरुण व्यक्ती ठरला. २०१५च्या महाराष्ट्र दिनी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने त्यांना ‘त्र्यंबकेश्वर भूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला. ‘शु. य. मा. ब्राह्मण’ संस्थेतर्फे देण्यात येणार्‍या पुरस्काराचा तो सलग १५ वर्षं मानकरी ठरला आहे. यासह अनेक खासगी संस्थांनी त्याला कलाक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

सिद्धार्थच्या चित्रांना अनेक वृत्तपत्रे, पुस्तके आणि नियतकालिके अन् दिनदर्शिकांवरही मानाचे स्थान मिळाले.त्यांच्या चित्रामध्ये पारंपरिक भारतीय आणि आधुनिक चित्रशैलीचा सुरेख संगम दिसतो. अ‍ॅक्रेलिक, ऑईल, जलरंग, चारकोल, पेस्टल अशा अनेक माध्यमांमध्ये सिद्धार्थ कामे करतो. अमूर्त आणि वास्तवदर्शी या दोन्ही प्रकारात त्याचा हातखंडा आहे. भारतीय पुराणावर आधारित ‘फेथ : दि रिलेशन बीटविन मॅन अ‍ॅण्ड गॉड’ या त्याच्या चित्रमालिकेचे रसिकांनी भरभरून कौतुक झाले.

आज सिद्धार्थ ‘संदीप फाऊंडेशन’ येथे डिझाईन विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्र्यंबकेश्वरजवळ पेगलवाडी येथे त्याने राहत्या घरी स्टुडिओ व आर्ट गॅलरी सुरू केली आहे. चित्रप्रदर्शन व चित्रविक्री या व्यतिरिक्त आर्ट कॅम्प, ‘लाईव्ह डेमॉस्ट्रेशन’, ‘गेस्ट लेक्चर’ असे त्याचे अनेक उपक्रम सुरू आहेत. “जेव्हा स्वतःची वेगळी ओळख निर्माण होते, तेव्हा जबाबदारीही वाढते. परंतु, जेव्हा हातून सुरेख, सर्जनशील अभिनव कलाकृती साकारली जाते अन् रसिक त्याला उदंड प्रतिसाद देतात, तेव्हा मिळणारा आनंद शब्दातीत असतो,” असे सिद्धार्थ सांगतो.

“चित्रप्रेमींनी माझ्या चित्रांची खरेदी करून माझ्या कलेची जी कदर केली, तो मी माझा सन्मान समजतो. कीर्ती, यश मिळवणे एक वेळ सोपे, पण निरंतर टिकवून ठेवणे आणि पचवणे अवघड असते,” असेही सिद्धार्थ सांगतो. आपल्या हातून जगातील सर्वोत्तमकलाकृती निर्माण होत राहाव्या आणि अध्यापन क्षेत्रात विश्वात देशाचे नाव उज्ज्वल करणारे सर्वोत्तम विद्यार्थी घडावेत, असे सिद्धार्थचे स्वप्न. त्याच्या या स्वप्नपूर्तीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा!

निल कुलकर्णी
 
 
Powered By Sangraha 9.0