‘तो’ व्हिडिओ आणि मातृशक्ती काय म्हणते?

23 May 2023 22:24:12
Supriya Sule viral video on social media

सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये चर्चेत आहे. व्हिडिओ जुना आहे. या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे तीन महिलांबाबत बोलत आहेत. तीनही महिला बुरख्यामध्ये आहेत. त्यापैकी एक महिला डॉक्टर असून तिचे नाव किरण कुलकर्णी आहे. सुप्रिया सुळे तिच्याशी झालेला संवाद अतिशय आनंदाने, उत्साहाने उपस्थित महिलांना सांगताना दिसतात. या व्हिडिओचा पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध काहीही असू दे.

मात्र, सुप्रिया सुळेंचा हा व्हिडिओ पाहून एक मात्र वाटते की, जी कोणी किरण कुलकर्णी आहे ती उच्चशिक्षित हिंदू मुलगी असून ती बुरखाा घालून आनंदी आहे. तिने स्वेच्छेने इस्लाम स्वीकारला. तिला कुराणाचा खूप अभ्यास आहे. ती ‘शरिया’ कायद्याला मानते. पण,त्याचवेळी ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानाला मानत नसावी. कायद्याला मानत नसावी, असे दिसते. कारण, पतीने संविधानयुक्त भारतात ‘शरिया’ कायद्यानुसार, तिला ’तलाक तलाक तलाक’ म्हणत सोडून दिले असते. तरीसुद्धा तिला काही हरकत नाही, असे तिने सुप्रिया सुळेंना सांगितले.

डॉक्टर असलेल्या जन्माने हिंदू असलेल्या किरण कुलकर्णी महिलेशी झालेला हा संवाद ऐकून माझ्या डोळ्यांसमोर मला भेटलेले ते दुःखी आईबाबा आठवले. ज्यांच्या मुली ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकल्या आहेत. श्रद्धा वालकर आणि रूपाली चंदनशिवेंची हत्या झाली. पण, ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरलेल्या मुली तर तीळतीळ करून नरकयातना भोगत आहेत. ‘लव्ह’ माहिती आहे, पण ‘जिहाद’ माहिती नसणार्‍या सुप्रिया सुळे यांच्या त्या व्हिडिओबाबत समाजातील विविध स्तरावर कार्यरत असणार्‍या महिलांचे काय म्हणणे आहे ते पाहू...

‘इसिस’सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे षड्यंत्र असलेल्या ‘लव्ह जिहाद’चे केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी अप्रत्यक्षरित्या समर्थन करणे, तसेच, ‘तिहेरी तलाक’सारख्या अनिष्ट प्रथेचे समर्थन करणार्‍या घटनेचे आनंदाने कथन करणार्‍या खा. सुप्रिया सुळे यांना सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ पाहून वाटते की, महिला असूनसुद्धा त्या राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेविषयी किती असंवेदनशील आणि अज्ञानी आहेत का?

अ‍ॅड. वर्षा डहाळे, प्रदेश सचिव,भाजप

हा व्हिडिओ जुना असेल. पण, त्यावेळी सुप्रिया सुळेंचे जे बोलणे होते ते खटकणारे आहे. त्यांनी त्या कुलकर्णी नावाच्या मुलीची गोष्ट सांगितली. आमच्यासारख्या सामान्य लोकांना ‘लव्ह जिहाद’ जे सत्य माहिती आहे. पण, शरद पवारांच्या खासदार कन्येला हे सत्य दुःख माहिती नाही. ‘लव्ह जिहाद’च्या बळी गेेलेल्या मुलींचे दुःख शब्दातही मांडू शकत नाही. सुप्रिया सुळे आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचा. किरण कुलकर्णीच्या कथेमागची व्यथा तुम्हाला समजेल.

शुभांगी जाधव, भीमकन्या, अध्यक्ष, क्रांती संघर्ष ट्रस्ट

सुप्रियाताई सुळे यांचा व्हिडिओ पाहिला. सुप्रियाताईंनी त्यांना भेटलेल्या या महिलांना साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचायला द्यावे. इज्जतीसाठी, धर्मासाठी आमच्या समाजाच्या आयाबाया लढतात, अगदी मरतातही. मात्र, धर्म सोडत नाहीत. संस्कृती राखतात. पण, या व्हिडिओमध्ये तर वेगळ्याच विषयावर संवाद साधला गेला आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल होत आहे, असे वाटते. हा व्हिडिओ पाहून वाटते की, इतर वेळी महिलांना समता, न्याय मिळावा म्हणून पोटतिडकीने बोलण्याचा सुप्रियाताई फक्त आव आणतात का?

डॉ. उज्ज्वला मोरे- हातागळे, साहित्यिक

एक उच्चशिक्षित डॉक्टर हिंदू महिला स्वेच्छेने बुरखा घालते. कुराणाचा अभ्यास करते आणि ‘तिहेरी तलाक’ कायदा चुकीचा आहे, असेही ती म्हणते. यावर सगळ्या उपस्थित महिला आनंदीत होत आहेत. कायद्याचे राज्य मानणारे कुणीही ‘तिहेरी तलाक’चे समर्थन करणार नाही. तसेच, आज वास्तव आहे की, अनेक मुली ‘लव्ह जिहाद’ने बर्बाद झाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा हा व्हिडिओ म्हणजे ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या मुलींच्या आणि त्यांच्या पालकाच्या दुःखावर चोळलेले मीठ आहे.

अ‍ॅड. सुधा जोशी, सामाजिक कार्यकर्ता


Powered By Sangraha 9.0