मुंबई महापालिका करणार १२ हजार कचऱ्यापेट्यांची खरेदी

    23-May-2023
Total Views |
Mumbai Municipal Corporation

मुंबई
: मुंबईतील कचरा एकाच ठिकाणी जमा करता यावा याकरिता मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी २४० लिटर क्षमतेच्या मोठ्या आकाराच्या कचरापेट्या बसवण्यात आल्या आहेत. मात्र यातील बहुतांशी कचरापेड्यांची दुर्दशा झाल्यामुळे पालिकेकडून मोठ्या आकाराच्या कचरापेट्यांची नव्याने खरेदी करण्यात येत आहे. दरम्यान सुमारे १२,००० कचरापेट्या खरेदी करण्यात येत असून एक ते दीड वर्षांपूर्वी दोन हजारांनी खरेदी केलेल्या कचरापेटीची किंमत २,४६६ रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे या कचरापेट्यांच्या किंमतीत सुमारे ४०० रुपयांची वाढ झाली आहे.

मागील काही वर्षांपासून मुंबईत २४० लिटर क्षमतेच्या कचरापेट्यांची कमतरता आहे. नगरसेवक निधीतून देण्यात येणाऱ्या १२० लिटर आणि २४० लिटर क्षमतेच्या कचरापेट्यांची खरेदी बंद करण्यात आली असल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागालाच या कचरापेट्यांची खरेदी करावी लागत आहे. २०२१- २२ साली पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून २४० लिटर क्षमतेची एक कचरा पेटी २०५६ रुपये दराने खरेदी करण्यात आली होती.

मात्र या कचरापेट्यांचा साठा संपुष्टात आल्यामुळे यंदा परत १२ हजार कचरापेट्यांची खरेदी करण्यात येत असून यासाठी निलकमल कंपनीची निवड करण्यात आली आहे. दरम्यान या कंपनीने प्रति नग २४६६ रुपये दर दिला असून याकरिता तब्बल २ कोटी ९५ लाख ९२ हजार रुपये खर्च पालिकेककडून करण्यात येणार आहे. परंतु पालिकेने २०२१-२२ साली २४० लिटर क्षमतेची कचरा पेटी २०५६ रुपयांमध्ये खरेदी केली असून आता त्याच प्रकारची कचरापेटी आता २,४६६ रुपयांमध्ये खरेदी करण्यात येणार असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.