ठाण्यात `मोदी@९' नुसार १५ ठिकाणी शिबिरे

भाजप जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांची माहिती

    23-May-2023
Total Views |
Modi@9 campaign in thane

ठाणे
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपातर्फे `मोदी@९' कार्यक्रमांतर्गत ठाणे शहरातील १५ ठिकाणी २४ ते २८ मेपर्यंत केंद्रीय व राज्य शासनाच्या योजनांचे नागरिकांना लाभ देण्यासाठी शिबिर भरविण्यात आले आहे, अशी माहिती भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांनी दिली.

ठाणे महापालिकेच्या विष्णूनगर शाळा क्र. १९ मधील शिबिरासह शहरातील १५ शिबिरांचे आ. निरंजन डावखरे व आ. संजय केळकर यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त वर्षा दीक्षित, जिल्हा अग्रणी बॅंकेचे अधिकारी नागेंद्र मंचाळ उपस्थित राहणार आहेत. विष्णूनगरबरोबरच राबोडीतील शाळा क्र. ५१, मनोरमा नगर येथील शाळा क्र. १२८, कोपरी येथील शाळा क्र. १६, किसननगर येथील शाळा क्र. २३, लोकमान्यनगर येथील शाळा क्र. ४६, काजूवाडी येथील शाळा क्र. १३०, कळवा येथील शाळा क्र. ६९, मुंब्रा येथील शाळा क्र. ७५, दिवा येथील शाळा क्र. ७९, सावरकर नगर येथील शाळा क्र. १२०, ओवळा येथील शाळा क्र. ५६, खोपट येथील शाळा क्र. १३, शिळगाव येथील शाळा क्र. ८१ आणि वसंत विहार येथील शाळा क्र. ४४ येथे उद्यापासून २८ मेपर्यंत सकाळी १० दुपारी दोनपर्यंत शिबिरे होणार आहेत.

भाजपाच्यावतीने महापालिकेच्या १५ शाळांमध्ये होणाऱ्या शिबिरात पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना (पेन्शन योजना), दीनदयाळ अंत्योदय योजना (स्वयंरोजगार कार्यक्रम), पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री ई-श्रम योजना, बचत गट नोंदणी व सवलतीत कर्जपुरवठा आदी योजनांसह राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या शिबिरासाठी येताना नागरिकांनी आधारकार्ड, जातप्रमाणपत्र, बॅंक पासबूक, उत्पन्नाचा दाखला, स्वत:चे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी घेऊन यावे, असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.