छत्तीसगढमध्ये २ हजार कोटींचा मद्य घोटाळा : ईडीचा दावा

23 May 2023 19:57:15
Liquor Scam Chhattisgarh

नवी दिल्ली
: छत्तीसगढमधील मद्य घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांसह १४ जणांची १२१ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. तसेच या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत १८० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. छत्तीसगढमधील मद्य घोटाळ्याप्रकरणी आयएएस अधिकारी अनिल टुटेजा आणि आयएएस अधिकारी ए. पी. त्रिपाठी, अन्वर ढेबर, अरविंद सिंग, विकास अग्रवाल यांच्यासह १४ जणांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अन्वर ढेबर याचे हॉटेल वेनिंग्टन कोर्टही जप्त करण्यात आले आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, २००० कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्याप्रकरणी १२१.८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने सुमारे ११९ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. यामध्ये आयएएस अनिल तुटेजा यांची ८.८३ कोटी, व्यापारी अन्वर ढेबर यांची ९८.७८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, ईडीने विकास अग्रवाल यांच्या १.५४ कोटी रुपयांच्या ३ मालमत्ता, ११.३५ कोटी रुपयांच्या अरविंद सिंगच्या ३२ आणि एपी त्रिपाठी यांच्या १.३५ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. याशिवाय अन्वर ढेबर यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये हॉटेल वेनिंग्टन कोर्ट रायपूरचा समावेश आहे.

ईडीने दारू घोटाळ्यात राज्यात २,००० कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार आणि हवाला व्यवहार केल्याचा दावा केला आहे. यामध्ये काँग्रेस नेते आणि रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांचा भाऊ अन्वर ढेबर याला अटक करण्यात आली आहे. राज्यात २०१९ ते २०२२ पर्यंत राज्यात २ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असेही ईडीने म्हटले आहे.



Powered By Sangraha 9.0