तुम्हीच आमचे तारणहार! ; प्रशांत महासागरातील द्वीप राष्ट्रांनी भारतावर व्यक्त केला विश्वास

मोदी यांना पापुआ न्यू गिनी आणि फिजीचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

    23-May-2023
Total Views |
narendra modi

नवी दिल्ली
: “भारताने आम्हाला संकटाच्या वेळी सर्वतोपरी मदत केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आम्ही भारतासोबत ठामपणे उभे राहणार आहोत,” असा सूर प्रशांत महासागर क्षेत्रातील द्वीप राष्ट्रांनी लावला असून एकप्रकारे तुम्हीच आमचे तारणहार, तुम्हीच आमचे नेते असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीमध्ये भारताविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पापुआ न्यू गिनी येथे हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (एफआयसीआयपी) तिसर्‍या ‘शिखर’ परिषदेस संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या काही वर्षात संपूर्ण जग कोरोना महामारी आणि इतर अनेक आव्हानांच्या कठीण काळातून गेले आहे. या आव्हानांचा प्रभाव ‘ग्लोबल साऊथ’मधील देशांना सर्वाधिक जाणवला आहे. हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, उपासमारी, गरिबी आणि आरोग्याशी संबंधित विविध आव्हाने आधीपासूनच होती. त्यामध्ये आता अन्न, इंधन, खते आणि औषधांच्या पुरवठा साखळीत नवे अडथळे निर्माण झाले आहेत,” असे ते म्हणाले.

ज्यांना आपण आपले विश्वासू मानत होतो, ते गरजेच्या वेळी आपल्या पाठीशी उभे राहिले नसल्याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी करून दिली. ते पुढे म्हणाले, “या आव्हानात्मक काळात जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र ही एक जुनी म्हण खरी ठरली आहे. या आव्हानात्मक काळात भारत आपल्या प्रशांत द्वीपसमूहातील मित्रांसोबत उभा राहिला याचा मला आनंद आहे. भारतात निर्मित लस असो वा जीवनावश्यक औषधे, गहू असो वा साखर; भारत आपल्या क्षमतेनुसार सर्व सहकारी देशांना मदत करत राहिला असून आगामी काळातही भारत तुमच्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असेही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

दरम्यान, ‘एफआयपीआयसी’च्या ‘शिखर’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्ट मोरेस्बी येथे न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांची भेट घेतली. हा या दोन्ही पंतप्रधानांमधील पहिलाच संवाद होता. उभय नेत्यांनी सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्य उपक्रमांवर चर्चा केली तसेच व्यापार आणि वाणिज्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, संस्कृती, क्रीडा आणि परस्पर लोक हितसंबंध यासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शवली.

द्वीपराष्ट्रांनी केला पंतप्रधान मोदी यांचा सन्मान

पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल सर बॉब दादाए यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ग्रँड कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ (जीसीएल) हा सन्मान दिला. पापुआ न्यू गिनी देशातील हा सर्वोच्च नागरी सन्मान असून हा सन्मान मिळवणार्‍याला ‘चीफ’ असे संबोधले जाते. त्याचप्रमाणे फिजीचे राष्ट्रपती रतु विलियम मायवाली काटोनिवेरे यांच्यावतीने पंतप्रधान राबुका यांनी पंतप्रधान मोदी यांना फिजीचा ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ (सीएफ) हा सर्वोच्चसन्मान प्रदान केला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.