आठ गाव मोरे राव परीवार देणार अल्प दरात रुग्णवाहिका सेवा

    23-May-2023
Total Views |
 

खेड: रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील आठ गाव राव परिवाराच्या श्री  कुंभाळजाईदेवी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून अठरा गाव बांदरी विभागाकरिता रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली असुन या रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा कोकणरत्न व वडगाव गाव चे सुपुत्र संजय बाबुराव मोरे, परिवहन सदस्य (क. डो. म. पा) यांच्या मातोश्री श्रीमती वनिता बाबुराव मोरे व पत्नी सौ.स्नेहल संजय मोरे  यांच्या हस्ते वडगाव बुद्रुक येथे पार पडले.

अठरा गाव बांदरी परिसर हा खेड तालुक्यातील अतीशय दुर्गम भागात येतो. या भागात दळणवळणची व्यवस्था तशी नेमकीच, अश्या या सह्याद्रीच्या दुर्गम भागातील ग्रामस्थांना गंभीर आजारप्रसंगी वाहतूक वेळेत ऊपलब्ध न झाल्याने अनेकांनी आपला जीव गमावले होते. कोरोना काळात व एस. टी संप काळात ग्रामस्थांना उपचार घेण्यासाठी प्रवासाकरिता भरपूर पैसे मोजावे लागले होते.  आपल्या भागातील ग्रामस्थ बांधवांचे तातडीच्या उपचारासाठी होणारे हाल, वेळेत न उपचार मिळाल्याने गेलेले जीव याची संस्थेने त्याच वेळी दखल घेऊन रुग्णवाहिका सेवा राबविण्याचा ठाम निश्चय केला होता.
 
यासाठी बऱ्याच दानशूर बंधूंनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला, परंतू निधी अपूरा पडत असल्याचे समजताच सेवेचे महत्त्व ओळखून सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रणी असलेले कोकणरत्न वडगाव बुद्रुक चे सुपुत्र श्री. संजय बाबुराव मोरे, (परिवहन सदस्य क.डो.म.पा) हे संस्थेच्या मदतीला आले. आणि त्यांनी संस्थेला नवी कोरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

आठ गाव मोरे राव परिवाराची श्री कुंभाळजाईदेवी सामाजिक विकास संस्था सह्याद्रीच्या दुर्गम भागात अठरा गाव बांदरी विभागासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर अल्प दरात रुग्णवाहिका सेवा देणार आहे. आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याप्रसंगी संस्था अध्यक्ष- भाऊराव मोरे, प्रशांत मोरे, विनोद मोरे, विजय मोरे, प्रदीप मोरे, दर्शनाताई मोरे, रेखाताई चव्हान, विश्वास कदम, चंद्रकांत बुवा मोरे, डॉ. मंगेश मोरे आदी मान्यवर उपस्थीत होते.  सदरचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे विकास मोरे, निलेश मोरे, आदित्य मोरे, मनोहर मोरे, चेतन मोरे, बाळाजीराव मोरे, सुनील मोरे, अरुण मोरे, मंगेश मोरे यांनी विशेष मेहनत घेतली. अत्यावश्यक काळात  या रुग्णवाहिका सेवेचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन संस्था अध्यक्ष भाऊराव मोरे यांनी केले आहे

WhatsApp Image 2023-05-23 at 19.07.16.jpg
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.