नव्या भारताचा सर्वोच्च सन्मान

    23-May-2023
Total Views |
Editorial on pm narendra modi honored with highest civilian award by Fiji and Papua New Guinea

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी तसेच पापुआ न्यू गिनी या देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. मोदी हे जागतिक नेतृत्व असल्याचे सांगत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर हा पुरस्कार म्हणजे १४० कोटी भारतीयांचाच सन्मान असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन कोणताही संकोच न बाळगता मोदी यांची स्वाक्षरी मागतात तेव्हा त्यांनीही मोदी यांचे नेतृत्वकौशल्य अप्रत्यक्षरित्या मान्य केल्यासारखेच असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांच्या हस्ते हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी हे जागतिक नेतृत्व असल्याचे सांगत त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. फिजीचा हा सर्वोच्च पुरस्कार फिजीबाहेरच्या केवळ निवडक नेत्यांनाच देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी हे त्यापैकी एक ठरले आहेत. हा पुरस्कार म्हणजे १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याची भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे. पापुआ गिनीनेदेखील त्यांचा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. “भारत तुमचा विकासातला सहकारी आहे, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. कोणतीही मानवी साहाय्यता असो अथवा विकास असो, तुम्ही भारताकडे एक विश्वासू सहकारी म्हणून पाहू शकता,” अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पापुआ गिनीच्या नागरिकांना आश्वासन दिले आहे.

विशेष म्हणजे, पंतप्रधान हे रविवारी जेव्हा पापुआ न्यू गिनीला उशिरा पोहोचले, तेव्हा संध्याकाळी सारे राजशिष्टाचार बाजूला ठेवत तेथील पंतप्रधान जेम्स मारपे यांनी त्यांचे स्वतः विमानतळावर स्वागत केले आणि त्यांना वाकून नमस्कार केला. ही घटना समाजमाध्यमांवर खूप चर्चेत आली. सर्वोच्च पुरस्कार मिळण्याची पंतप्रधान मोदी यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक देशांनी मोदी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. पंतप्रधान म्हणून काम करताना त्यांनी दाखवलेल्या नेतृत्वाचे तसेच दूरदृष्टीचे प्रतिबिंब त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमधून दिसून येते. कोरोना काळात पाश्चात्य देशांनी लसींची दारे बाहेरच्या जगासाठी बंद केलेली असताना, मोदी यांनी न्यू गिनीच्या नागरिकांसाठी लाख लसी मात्रा पाठवल्या होत्या. पापुआ न्यू गिनीने मोदी यांचा ‘सर्वोच्च नागरी सन्माना’ने गौरव करत कृतज्ञताच व्यक्त केली, असे म्हटल्यास त्यात काहीही गैर ठरणार नाही.


23 May, 2023 | 21:36

अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सर्वोच्चनागरी सन्मान’ देऊन गौरव केला आहे. त्यांच्या या गौरवात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते. मोदी यांना मिळालेल्या या पुरस्कारांमुळे जागतिक स्तरावर भारत महासत्ता म्हणून उदयास येत आहे, याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. जगभरातील सर्वच देशांबरोबर या नव्या भारताचे वृद्धिंगत होत असलेले संबंधही प्रतीत होतात, असे मानले जाते. सौदी अरेबियाने सर्वप्रथम २०१६ मध्ये मोदींना सन्मानित केले होते. त्याचवर्षी अफगाणिस्ताननेही त्यांचा गौरव केला होता. पॅलेस्टाईन, संयुक्त अरब अमिराती, रशिया, मालदीव, अमेरिका, भूतान या देशांनीही मोदी यांना सन्मानित केले आहे. त्याशिवाय जगभरातील अनेक प्रतिष्ठित संस्थांनीही त्यांना गौरवलेले आहे. जागतिक शांततेसाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल ‘सोल शांतता पुरस्कारा’ने २०१८ मध्ये, पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा संयुक्त राष्ट्राने दिलेला पुरस्कार, उत्कृष्ट नेतृत्वासाठी दिला जाणारा ‘फिलिप कोटलर पुरस्कार’ यासह ‘बिल गेट्स फाऊंडेशन’तर्फे स्वच्छ भारत मोहिमेसाठी दिलेला ‘ग्लोबल गोलकीपर’ हे सर्व पुरस्कार त्यांच्या कार्याचे यथोचित गौरव करणारे ठरतात.

नुकताच मोदी यांनी जपानचा दौरा केला. यात ‘जी ७’ समूहाच्या बैठकीला त्यांना अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. रशियाला रोखण्यासाठी या बैठकीचे मुख्यत्वे आयोजन करण्यात आलेले असले, तरी विस्तारवादी चीनला कसे रोखता येईल, यावरच चर्चेचा केंद्रबिंदू राहिला. चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पाश्चात्य देशांतील बहुराराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाचे ते प्रमुख केंद्र आहे. त्यामुळेच चीनविरोधात उघडपणे भूमिका अमेरिकाही घेत नाही. मात्र, चीनला रोखायला हवे, यावर या बैठकीत एकमत झाले. आशिया खंडात चीनच्या विरोधात केवळ भारतच ठामपणे उभा राहू शकतो, हे संपूर्ण जगानेच आता मान्य केलेले आहे. ‘जी ७’ समूहाने त्यावर शिक्कामोर्तब केले इतकेच. रशिया-युक्रेन युद्धात भारताने पहिल्या दिवसापासून तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. जी अत्यंत नैसर्गिक अशीच होती. तथापि, रशियाला रोखण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित राहून रशियाने एकप्रकारे रशियाविरोधात मत व्यक्त केले आहे, असे मानले जाईल. रशियाही चीनबरोबरचे संबंध वृद्धिंगत करत आहे. म्हणजे आशिया खंडातील सत्तासमतोल राखण्याची संपूर्ण जबाबदारी भारतावर आली आहे, असे म्हणता येते.


23 May, 2023 | 21:36

‘जी ७’ परिषदेत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोदी यांची स्वाक्षरी मागितली. “तुम्ही माझ्यासाठी एक समस्या उभी करत आहात. पुढच्या महिन्यात आम्ही तुमच्यासाठी वॉशिंग्टनमध्ये रात्रीचे जेवण आयोजित केले आहे. (जून महिन्यात मोदी अमेरिका दौर्‍यावर रवाना होणार आहेत.) अमेरिकेतील प्रत्येकाला यावेळी यायचे आहे. तिकिटे संपली आहेत. तुम्हाला वाटते की मी गंमत करतोय? माझ्या सहकार्‍यांना विचारा. मला अशांचे फोन येत आहेत, ज्यांच्याबद्दल मी यापूर्वी कधी ऐकलेही नाही. यात चित्रपट कलावंतांपासून ते नातेवाईकांपर्यंत सर्वजण आहेत. तुम्ही खूप लोकप्रिय आहात,” असे बायडन यांनी ट्विट करून सांगितले आहे. मोदी हे केवळ भारताचे नेते राहिलेले नाहीत, तर जागतिक पातळीवरचे नेतृत्व अशी त्यांची नवी ओळख रूढ झाली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने त्यांची स्वाक्षरी मागणे, ही त्यामुळे अत्यंत स्वाभाविक अशी बाब.

भारतातील मोदींचे राजकीय विरोधक आजही स्वप्नरंजनात मग्न आहेत. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदी यांचा पराभव कसा करता येईल, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मोदी मात्र नेहमीप्रमाणेच विरोधकांच्या कोणत्याही टीकेला शब्दाने उत्तर न देता, आपल्या कार्यातून नव्या भारताची नवी ओळख जागतिक पातळीवर प्रस्थापित करत आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.