पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीचे प्रकरण ; केजरीवालांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

23 May 2023 18:40:00
Delhi Arvind Kejriwal AAP

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीबाबत गुजरात विद्यापीठाने दाखल केलेल्या फौजदारी मानहानी खटला दाखल केला आहे. याप्रकरणी अहमदाबाद न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ जून रोजी होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीविषयी अपमानजनक वक्तव्य केले होते. त्याप्रकरणी गुजरात विद्यापीठातर्फे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा खटला अहमदाबाद येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला आहे.

याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. पांचाळ यांच्यासमोर सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खासदार संजय सिंह यांना येत्या ७ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. न्यायालयाने यापूर्वी २३ मे रोजीच न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, मुख्यमंत्री केजरीवाल आणि खासदार सिंह हे २३ मे रोजी हजर राहिले नाही. परिणामी न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे.



Powered By Sangraha 9.0