आत्मनिर्भर भारत : संरक्षण क्षेत्राचा १ लाख कोटीचा टप्पा पूर्ण!

23 May 2023 12:37:53
Defence Production witnesses 12 per cent hike in FY 22-23

नवी दिल्ली
: संरक्षण मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये संरक्षण उत्पादनाच्या मूल्याने प्रथमच एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या हे मूल्य १,०६,८०० कोटी रुपये इतके असून उर्वरित खाजगी संरक्षण उद्योगांकडून आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर त्यात आणखी भर पडेल. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये संरक्षण उत्पादनाचे सध्याचे मूल्य २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १२ टक्क्यांहून अधिक वाढलेले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात हे मूल्य ९५,००० कोटी रुपये इतके होते.

संरक्षण उद्योग आणि त्यांच्या सहयोगी संघटनांसमोरील आव्हाने दूर करण्यासाठी तसेच देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार सतत काम करत आहे. व्यवसाय सुलभ करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुरवठा शृंखलेत सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच स्टार्ट-अप्सच्या एकत्रीकरणासह अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

या धोरणांमुळे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच स्टार्ट-अप्ससह उद्योग संरक्षण डिझाइन, विकास आणि उत्पादन क्षेत्रात पुढे येत आहेत आणि गेल्या ७-८ वर्षांत सरकार द्वारे उद्योगांना जारी करण्यात आलेल्या संरक्षण परवान्यांच्या संख्येत जवळपास २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या उपाययोजनांमुळे देशातील संरक्षण औद्योगिक उत्पादन परिसंस्थेला चालना मिळाली आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी देखील निर्माण झाल्या आहेत.

 
Powered By Sangraha 9.0