काँग्रेसचे भोंदूत्व

    23-May-2023
Total Views |
Congress party political statements

देशातील मतदार जसजसा साक्षर होत आहे, तसतशी काँग्रेसची लोकप्रियता घसरत असून अनेक राज्ये काँग्रेसमुक्त झाली आहेत. गमावलेली पत परत मिळावी, यासाठी काँग्रेसची प्रचंड धडपड सुरू आहे. त्यातूनच त्यांचे नेते धार्मिक स्थळांना भेटी देऊन मतदारांना चुचकारण्याचा देखील आटोकाट प्रयत्न करतात. अर्थात, त्यात त्यांना मुळीच यश मिळत नाही. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षित विजय मिळाला. त्यामुळे हुरळून गेलेले काँग्रेसी आणि त्यांचे मित्रपक्ष यांचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आला आहे. सत्ता हाती येताच काँग्रेस पक्षाने कर्नाटक विधानसभेचे चक्क शुद्धीकरण केले. पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा भवनात गंगाजल आणि गोमूत्र शिंपडले व हवन पूजनानंतर हनुमान चालीसाचे पठण केले. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष एकीकडे ‘सर्वधर्मसमभाव’ असा नारा देतात, तर दुसरीकडे भाजपवर धर्मांधतेचा शिक्का मारतात. निवडणुका तोंडावर येताच केवळ मतांसाठी काँग्रेसी नेते सवंग घोषणा करत असतात. त्यातून केवळ सत्ता मिळविणे हा एकमेव अजेंडा ते राबवतात. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बजरंग दलावर बंदी आणण्याची घोषणा करणार्‍या काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा भोंदुगिरी सुरू केली आहे. त्यातूनच त्यांनी विधानसभा भवनात गंगाजल आणि गोमूत्र शिंपडले व हवन पूजनानंतर हनुमान चालीसाचे पठण केले. काँग्रेसचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष उद्धव ठाकरे यांच्या गटाने यावर मात्र मौन स्वीकारले आहे. ‘आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही,’ अशी टीका उद्धव आपल्या भाषणातून भाजपवर नेहमीच करतात. त्याचप्रमाणे हनुमान चालीसाचे पठण करणार्‍या राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकणे, पालघर येथील साधूंचे हत्याकांड झाले तरी त्याकडे सपशेल कानाडोळा करणे, असे प्रकार ठाकरेंनी सत्तेत असताना केले. आताही काँग्रेसच्या या चक्क विधानसभेत गंगाजल शिंपडण्याच्या कृत्याबद्दल ठाकरेंनी स्वीकारलेले मौन किती दुटप्पी आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. इतरांना उपदेश देताना आपला पक्ष, आपले कार्यकर्ते आणि मित्रपक्ष हे त्याच बाबतीत नेमके काय करतात, कसे वागतात, हे उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस नेत्यांनी एकदा जवळून पाहावे, म्हणजे खरे भोंदू कोण आहेत, याचे त्यांना उत्तर मिळेल!

काँग्रेसची मुजोरी

काँग्रेसच्या हाती सत्ता येताच त्यांची मुजोरी सुरू होत असते. हा आजवरचा इतिहास. त्यामुळे अनेकांना जीवानिशी जाण्याचीही वेळ आली. महाराष्ट्रात काँग्रेस सहभागी असलेल्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर सोशल मीडियातून व्यक्त झालेला अभियंता अनंत करमुसे यांना त्यावेळचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली. त्याची दखल न्यायालयाने घेताच आव्हाड यांना अटक करून जामिनावर सुटका झाली होती. ही घटना महाराष्ट्र अद्याप विसरलेला नसताना, महाराष्ट्राच्या शेजारी कर्नाटकात हेच साम्य असलेली घटना घडली आहे. कर्नाटकमधील एका प्राथमिक शिक्षकाने काँग्रेसी सिद्धरामय्या यांच्या सरकारच्या मूल्यांवर सोशल मीडियावर काही प्रश्न उपस्थित केले. परंतु, त्या शिक्षकाला हे प्रश्न विचारणं चांगलच महागात पडलं. या शिक्षकावर कारवाई करत त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. वास्तविक, शिक्षक हा चिकित्सक असतो. त्यातूनच तो विद्यादान करताना, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही देत असतो. मात्र, या शिक्षकाने उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन करण्याऐवजी त्याच्यावर निलंबनाची केलेली कारवाई कितपत योग्य आहे, याप्रकरणी नेटकर्‍यांनी काँग्रेसी एकाधिकारशाहीला चांगलेच झोडपले आहे. तसे पाहता, या शिक्षकाने तुलनात्मक माहितीच्या आधारे काही प्रश्न उपस्थित केले जे वस्तुनिष्ठ होते. त्यात काँगे्रस सरकारने दिलेल्या आश्वासनांवर या शिक्षकाने प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांमुळे राज्यावरील कर्जाचा भार वाढणार असल्याचा दावादेखील या शिक्षकाने या पोस्टमध्ये केला आहे. तसेच, या शिक्षकाने आकडेवारीचा संदर्भ देत, कृष्णा यांच्या कार्यकाळापासून ते शेट्टार यांच्या कार्यकाळापर्यंत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या कर्जाचा आकडा किती जास्त आहे, याची तुलना केली आहे. पण, अशाप्रकारे सरकारवर टीका केली म्हणून शिक्षकाला निलंबित करण्यात येेणे ही बाब खटकणारी आहे. सिद्धरामय्या यांच्या काळात किती कर्ज झाले हे निदर्शनास आणून देण्याचे धारिष्ट्य त्या शिक्षकाने दाखविले. त्याचे कौतुक करत शंकांचे निरसन करायला हवे होते. परंतु, त्या शिक्षकाला निलंबित करून काँग्रेसी मुजोरी पुन्हा सुरू झाल्याचा हा इशाराच आहे.

मदन बडगुजर

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.