छत्रपती शिवाजी महाराजांशी राहुल गांधींची तुलना केल्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

    23-May-2023
Total Views |
Chandrasekhar Bawankule on Congress

मुंबई
: राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याबद्दल काँग्रेसने तातडीने देशाची माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिला. तसेच नवाब मलिक यांच्या अटकेबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करू नये, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे. मंगळवार, दि. २३ मे रोजी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, चैनसुख संचेती , प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते.

बावनकुळे यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाकडून प्रसारीत केल्या गेलेल्या एका व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आली आहे. या प्रकाराबद्दल काँग्रेसने तातडीने देशाची माफी मागावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी याविरोधात आंदोलन करेल. मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या देशद्रोही दाऊद इब्राहिम टोळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांचा आणि नवाब मलिक यांच्या अटकेचा काहीच संबंध नाही. मात्र शरद पवार यांना जनतेची दिशाभूल करण्याची सवय आहे. या सवयीतूनच पवार यांनी नवाब मलिक यांच्या अटकेबाबत चुकीची माहिती दिली आहे. पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जनतेत या पद्धतीने संभ्रम पसरवू नये, असे ते म्हणाले.

मविआकडूनच पवारांची बदनामी !

''माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीने प्रवेशाचे निमंत्रण दिलेले नाही , अजित पवारांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. असे असताना अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या बातम्या वारंवार पसरवल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनच अजित पवारांची बदनामी केली जात आहे,'' असा आरोपही त्यांनी केला आहे.

अन्यथा देशमुखांचीही तक्रार करू !

''माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. देशमुखांवरील आरोपांची सुनावणी न्यायालयात अजून सुरु असताना खुद्द अनिल देशमुख न्यायालयाबाबत मतप्रदर्शन करीत असल्याने न्यायालयाचा अवमान होत आहे. देशमुख यांनी या बाबत जाहीर वक्तव्ये न थांबविल्यास न्यायालयाकडे त्यांची तक्रार करू,'' असा इशाराही त्यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांना दिला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.