मुंबईच्या वेशीवर गव्याचे दर्शन!

तळोजा ‘एमआयडीसी’मध्ये शिरलेल्या गव्याचा सुरक्षितरित्या बचाव

    22-May-2023
Total Views |
gaur

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पनवेल येथील तळोजा 'एमआयडीसी' परिसरात रानगवा शिरल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या संदर्भात वनविभागाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन 'रेस्क्यू' या संस्थेच्या मदतीने चार तासांत गव्याचे बचावकार्य सुरक्षितरित्या पूर्ण केले. या घटनेमुळे उत्तर सह्याद्रीमधील रानगव्यांचा वाढता वावर पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
तळोजा 'एमआयडीसी' परिसरात रविवारी शिरलेला गवा हा डिसेंबर महिन्यापासून याच परिसरात वावरत होता. प्रथम त्याचे दर्शन डिसेंबर महिन्यात तळोजानजीक असलेल्या शिरवली आणि रिटघर या गावांमध्ये झाले होते. त्यानंतर या गव्याने मलंगगडमार्गे थेट कल्याण-डोंबिवलीचा परिसर गाठला होता. त्याठिकाणी वन विभागाने स्थानिक त्याच्यावर नजर ठेवून त्याला मलंगगड डोंगररांगाच्या दिशेने पाठवले. दि. 19 मार्च रोजी या गव्याचे दर्शन माथेरानमध्ये घडले. लुईसा पॉईंट येथे स्थानिकांना तो दिसला. त्याठिकाणी देखील वन विभागाने त्याच्यावर नजर ठेवून कर्जतच्या दिशेने पाठवले. दि. 20 मार्च रोजी कर्जत येथे त्याचे शेवटचे दर्शन घडले. त्यानंतर रविवार, दि. 21 मे रोजी हा गवा तळोजा 'एमआयडीसी' परिसरात फिरताना आढळून आला.
पनवेल वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पुण्याहून 'रेस्क्यू' या वन्यजीव बचाव संस्थेच्या चमूलादेखील पाचारण करण्यात आले. सायंकाळी 4.30 वाजता त्यांनी घटनास्थळी पाहणी करुन त्याठिकाणी वावरणार्‍या गव्याला एका रिकामी गोदामाच्या दिशेने पाठवले. गवा गोदामात शिरल्यानंतर गोदाम बंद करण्यात आले. त्यानंतर गोदामाच्या दरवाज्यासमोर कंटेनर ट्रक लावण्यात आला. या कंटेनर ट्रकमध्ये चारा भरून गव्याच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली. त्यानंतर गोदामामधून गव्याला या कंटेनर ट्रकच्या दिशेने हुसकवण्यात आले. कंटेनर ट्रकला लावलेल्या रॅम्पच्या आधारे गवा सुरक्षितरित्या ट्रकमध्ये चढल्यानंतर दार बंद करून त्याला पकडण्यात आल्याची माहिती 'रेस्क्यू'च्या नेहा पंचमिया यांनी दिली.
गव्यासारख्या मोठ्या प्राण्याला अवघ्या चार तासांमध्ये सुरक्षा बाळगून पकडण्यामध्ये वन विभाग आणि रेस्क्यू टीमला यश मिळाले. रात्री उशिरा या गव्याला भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यामध्ये सोडण्यात आले. हे बचावकार्य अलिबागचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक संजय वाघमोडे, पनवेलचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्रर सोनावणे, वनकर्मचारी, 'रेस्क्यू'चे तुहीन सातारकर, किरण रहाळकर, अमित तोडकर, आयुष पाटील, सायली पिल्लाने, राजू सय्यद, डॉ. निकिता मेहता आणि डॉ. कल्याणी ठाकूर यांनी केले.
गव्याच्या विस्तारणार्‍या पाऊलखुणा
पश्चिम घाटाच्या दक्षिणेपुरता यापूर्वी मर्यादित असलेला रानगव्याचा अधिवास गेल्याकाही वर्षांमध्ये समुद्र किनारपट्टी आणि उत्तर पश्चिम घाटात दिसून येत आहे. गुहागर, रत्नागिरी आणि गावखडीच्या किनार्‍यावर गव्यांचा वावर आढळून आला आहे. बारवी, माहुली, जुन्नर, कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, फणसाड वन्यजीव अभयारण्य परिसरातही गव्यांचे दर्शन घडले आहे. गव्याच्या नराचे वजन एक ते दीड टन आणि मादीचे वजन 700 ते हजार किलोच्या दरम्यान असते. उंची साधारण 165 ते 220 सें.मीटरपर्यंत असते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.