पोटदुखी : निदान आणि उपचार

    22-May-2023
Total Views |
treatment of Stomach ache

पोटात दुखण्याची अनेक कारणे आहेत. काही सौम्य स्वरुपाची असतात, जी घरगुती औषधे आणि पथ्त पाळल्याने बरे होऊ शकतात. घरगुती उपायाने बरे न झाल्यास फॅमिली डॉक्टरकडे जावे लागते. डॉक्टर व्यवस्थित ‘हिस्ट्री’ घेऊन व तपासणी करुन पोटदुखीचे निदान करतात. पोटदुखीच्या आजारातून बरे होण्यासाठी काही औषधे देतात. बर्‍याच वेळा या पोटदुखीसाठी काही चाचण्या कराव्या लागतात. ‘सीबीसी’, लघवीचा तपास, सिरम बिलिरूबीन, सिरम क्रियाटिनीन यासारख्या चाचण्या कराव्या लागतात. आजाराचे निदान पक्के करण्यासाठी काही वेळा सोनोग्राफीचा सल्ला दिला जातो. काही वेळा ही पोटदुखी त्रासदायक ठरुन रुग्णास हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते. तेव्हा, आजच्या लेखात पोटदुखीविषयी सविस्तर जाणून घेऊया...

पोटदुखीची कारणे

ही यादी फार मोठी आहे. गॅस होणे, अपचन, अ‍ॅसिडीटी इत्यादी कारणांमुळे पोट दुखते. धुम्रपान, मद्यपान, जागरण, जेवणाच्या अनियमित वेळा आणि तिखट व मसालेदार जेवण यामुळेदेखील पोटदुखी सुरू होऊ शकते. कावीळ, पित्ताशयात खडे तयार होणे, आतड्याला व्रण पडणे, मुत्राशयाच्या मार्गात खडे तयार होणे, आतड्यांना पीळ पडणे, आतड्यांना सूज येऊन अंर्तगत रक्तस्राव होणे, ‘अ‍ॅपेंडिक्स’चा दाह, बेंबीचा हर्निया, अमिबियासिस, टायफॉईड, आतड्याचा क्षयरोग, आतड्याचा कर्करोग ही काही पोटदुखीची इतर कारणे आहेत.

या पोटदुखी बरोबर इतरही काही लक्षणे असतात. उदाहरणार्थ : उलट्या होणे, ताप येणे, जुलाब होणे, लघवी लालसर होणे, शौचातून रक्त जाणे, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, थकवा येणे ही लक्षणेसुद्धा दिसतात. अशा वेळेस पोटदुखीचे निदान होणे महत्त्वाचे असते. पोटदुखीचे निदान करणे हे फॅमिली डॉक्टरचे खरे कौशल्य असते.

जेव्हा पोटदुखीचा रुग्ण फॅमिली डॉक्टरकडे येतो, तेव्हा त्याची व्यवस्थित ‘हिस्ट्री’ घेऊन आणि तपासणी करुन पोटदुखी सौम्य स्वरुपाची आहे की ‘सर्जिकल टाईप’ची आहे, हे ठरवावे लागते. औषधाने बरे न वाटल्यास निदान करण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात.

पोटदुखी नेमक्या कुठल्या भागात आहे, याचादेखील निदान करण्यास उपयोग होतो. तपासणीच्या दृष्टीने पोटाचे नऊ भाग करण्यात येतात. विशिष्ट भागात दुखत असल्यास त्या भागातील अवयवाचे आजार असण्याची शक्यता बळावते. उदा. बेंबीच्या भोवती व पोटाच्या खालच्या, उजव्या भागात दुखत असल्यास ‘अ‍ॅपेंडीसायटिस’ची शक्यता जास्त असते. कंबरेच्या उजव्या व डाव्या कुशीत दुखत असल्यास मुतखड्याची शक्यता असते. पोटाच्या वरच्या व उजव्या बाजूस दुखत असल्यास पित्ताशयातील खड्याची शक्यता असते. या सर्व गोष्टी आपण न ठरविता आपल्या डॉक्टरांना ठरवू द्या. डॉक्टर व्यवस्थित ‘हिस्ट्री’ घेऊन, तपासणी करून निदान करतील. डॉक्टरांचा सल्ला तंतोतंत पाळा. पण, आपल्या मनाने निदान ठरवू नका.

उपचार

पोटदुखी कमी प्रमाणात असेल, तर घरगुती उपाय करण्यास हरकत नाही. मसाला सोडा, जलजीरा याचा उपयोग करावा. मळमळत असल्यास लिंबू सरबत घ्यावे. पोटात जळजळ असेल, तर थंड दूध घ्यावे. याने आराम न पडल्यास फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यावा. आपल्या मनाने गोळ्या औषधे घेणे शक्यतो टाळावे.

पोटदुखी थांबविण्यासाठी बर्‍याच वेळा ‘सायक्लोपाम’चे इंजेक्शन दिले जाते. ज्या आजाराचा संशय येतो, त्याप्रमाणे चाचण्या करण्यास सांगण्यात येते. पित्ताशयातील खडा, मूतखडा, अ‍ॅपेंडिसायटिस, हर्निया यासारखे सर्जिकल आजार निघाल्यास रुग्णास सर्जनचा सल्ला घेण्यास सांगितले जाते.

फार थोड्या रुग्णांना सर्जनकडे जावे लागते. पोटदुखी ही नेहमीच्या औषधाने बरी होते. ‘अ‍ॅमिबियासीस’ असेल, तर त्याच्या औषधांचा पूर्ण कोर्स घ्यावा. जंताचा प्रादूर्भाव जाणवत असल्यास जंतगोळी घ्यावी. या पोटदुखीसोबत उलटी, जुलाब, ताप यासारखी लक्षणे असल्यास त्यावर लागू पडणारी औषधे डॉक्टर देतात. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावी. औषधे गरम पडतात हा रुग्णांचा गोड गैरसमज आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

पावसाळा जवळ येत आहे. पावसाळ्यात पिण्याचे पाणी गढूळ येते. त्यामुळे अमिबिआसीस, टायफॉईड, कावीळ यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. शक्य असल्यास घरी अ‍ॅक्वागार्ड लावावे. ते शक्य नसेल, तर झिरो बी, वॉटर फिल्टरचा वापर करावा. पावसाळ्यात पाणी गढूळ येत असल्यास ते गाळून व उकळून घ्यावे.

बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे. गेल्या दहा वर्षांत माशांचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्यामुळे माशांमुळे होणार्‍या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होत चालले आहे. मसालेदार व अतितिखट खाणे कमी करावे. जेवणात पालेभाज्या, उसळी, सॅलेड यांचे प्रमाण वाढवावे. समतोल व सहा रसांनी युक्त असा आपला आहार असावा. जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. रात्रीचे जेवण फार उशिरा नसावे.

पोटदुखी व अ‍ॅसिडिटीचे आणखी एक कारण म्हणजे, चिंता, ताण-तणाव, धुम्रपान आणि मद्यपान. जीवन पद्धतीत सुधारणा केल्यास यावर मात केली जाऊ शकते. नियमित व्यायाम, चालणे, योगा, ध्यानधारणा यानेदेखील आपण आपली पोटदुखी दूर ठेवू शकता. आमच्या लहानपणी दर महिन्याला एरंडेल तेल प्यायला लागायचे. हे रेचक घशाच्या खाली उतरायचे नाही. परंतु, माराच्या भीतीने ते प्यावे लागायचे. पुढच्या काही तासांत पोट अगदी साफ होऊन जायचे. हल्ली ती प्रथा बंद झाली आहे. ‘क्रिमाफिन’ व ‘इसबगोल’ ही सौम्य रेचके बाजारात उपलब्ध आहेत. अगदी गरज वाटल्यास या रेचकांचा उपयोग करावा. बडीशेप, सुपारी यांचा उपयोग पाचक म्हणून करावा.

अ‍ॅबडॉमिनल कॉलिक

हा आजार जन्मानंतर काही आठवड्यांत उद्भवतो. लहान मुलांना बोलता येत नसते. त्यामुळे ते आपल्या भावना मोठ्याने रडून व्यक्त करतात. चार ते आठ आठवड्याचे मूल सारखे रडत असल्यास ‘अ‍ॅबडॉमिनल कॉलिक’ची शक्यता तपासावी लागते, अशा मुलांचे पोट गच्च व कडक झालेले असते. पोटावर हळूवार हात फिरविल्यास व बाळाने गॅस पास केल्यावर किंवा शी केल्यावर बाळाचे रडणे कमी होते. बाळ जास्तच रडत असल्यास ‘कॉलिमेक्स’ या औषधाचे सहा थेंब घ्यावे. तरीही बाळ रडायचे न थांबल्यास फॅमिली डॉक्टर किंवा बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

डॉ. मिलिंद शेजवळ 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.