जाऊ कासवांच्या गावा...

22 May 2023 17:24:04
turtle day


सागरी कासवे... गेल्या काही वर्षांपासुन भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात चर्चेचा ठरत असलेला आणि लक्ष वेधुन घेणारा असा विषय. समुद्रातील अनाकलनीय असे प्रचंड मोठे विश्व पाहिलेली ही कासवे जवळजवळ आपलं संपुर्ण आयुष्य पाण्यात घालवतात. समुद्री कासवे किंवा खार्‍या पाण्यातील कासवे म्हणुन ही ओळख असलेल्या या कासवांच्या जगभरात एकुण सात प्रजाती आढळुन येतात. ऑलिव्ह रिडले, हॉक्स बिल, ग्रीन सी, लॉगर हेड, लेदर बॅक, फ्लॅट बॅकआणि केम्स रिडलेया त्या सात प्रजाती.त्यांची नावे हीत्यांच्या रंगांमुळे किंवा शरिराच्या ठेवणीमुळे पडली आहेत. ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी टर्टल, लेदर बॅक, हॉक्स बिल, फ्लॅट बिक हे त्याचप्रमाणे ओळखले जातात. यापैकी ऑलिव्ह रिडले, हॉक्स बिल, ग्रीन सी, लॉगर हेड आणि लेदर बॅक या पाच प्रजाती भारतीय उपखंडामध्ये आढळतात.


आपले संपुर्ण आयुष्य पाण्याखाली घालवत असली तरी पुढच्या पिढीला जन्म देण्यासाठी त्यांना पाण्यामधुन बाहेर येऊन वाळुचा आसरा घ्यावा लागतो. आपला जन्म ज्या ठिकाणी झाला त्या किंवा त्याजवळपासचा किनारा निवडुन मादी कासवे आपली अंडी घालते. जणु काही तिची नाळ तिथे जोडलेली असते की काय, असं म्हंटले तरी वावगं ठरणार नाही. अंडी घालण्याच्या काळात केवळ समुद्राच्या किनारी भागात ही मादी कासवे येत असुन नर कासवे अगदी क्वचितच किनार्‍यावर येतात. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले ह्या प्रजातीची मादी कासवे मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यासाठी येतात. काही वर्षांपुर्वी इथे कासवांविषयी स्थानिक लोकांमध्ये जनजागृती नव्हती. सह्याद्री निसर्ग मित्र या पर्यावरणासाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतल्याने 2003 मध्ये कासव संवर्धनाच्या एका मोठ्या मोहिमेची मुहुर्तमेढ रोवली गेली. त्याआधी या कासवांची अंडी चोरुन खाणार्‍या स्थानिकांनाच या संवर्धन मोहिमेत सहभागी करुन घेतले.



turtle day


समुद्रातील कासवांमध्ये ऑलिव्ह रिडले आणि केम्स रिडले या दोन प्रजाती मोठ्या प्रमाणात अंडी घालत असल्याचे संशोधनांती निदर्शनास आले आहे. अंडी घालण्याच्या काळात 8-10 दिवसांचा काळ असा येतो जेव्हा मोठ्या संख्येने किनार्‍यावर येऊन कासवे अंडी घालतात. यंदा ओरिसा राज्यात साधारण 6.25 लाख माद्यांनी अंडी घातली अशी माहिती समजली आहे. गेली 20 वर्षे अविरत चालवलेल्या अभ्यासपुर्ण प्रयत्नांचे यश म्हणुन की काय ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनामुळे किनार्‍यावर येण्याच्या त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.त्याचबरोबर आश्चर्य म्हणजे यावर्षी पहिल्यांदा ग्रीन सी टर्टलची काही घरटी भारतीय किनार्‍यावर सापडल्याचे समजले आहे.गेल्या वर्षी म्हणजे 2021-22 साली ग्रीन सी टर्टलची घरटी काही भागात सापडली. समुद्री कासवांच्या बाबतीत जगभरात संवर्धनाच्या कामाबरोबर संशोधन मोठ्या प्रमाणात सुरु आहे, यामध्ये भारताचा पुर्व किनारा ही चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. एकंदर पाहता या वर्षी समुद्री कासवांच्या घरट्यांची संख्या भारताच्या सगळ्या किनार्‍यांवर वाढलेली समजते. समुद्राच्या अंतरंगात आपलं संपुर्ण आयुष्य व्यतीत करणार्‍या या कासवांविषयी मानवी मनामध्ये अधिक उत्सुकता आहे.


यामुळेच त्यांच्यावर संशोधल करता यावे या हेतुने वाईल्डलाईफ इंस्टिट्युट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र कांदळवन कक्षाच्या मार्फत काही कासवांना सॅटेलाईट टॅग ही लावण्यात आले आहेत. यामध्ये टॅग केलेल्या ‘बागेश्री’ या मादी कासवीण आता केरळात जाऊन पोहोचली आहे. ही प्रगती आपण केली असली तरी काही धोक्यात असलेल्या काही प्रजातींच्या संवर्धनाचा संकल्प हीच खर्‍या अर्थाने जागतिक कासव दिनाची शुभेच्छा ठरेल.
- मोहन उपाध्ये 


Powered By Sangraha 9.0