काळ बनून आली व्हॅनिटी व्हॅन

कोंढव्यात भरधाव बसचा थरार : सहा वाहनांना धडक, एकाचा मृत्यू

    22-May-2023
Total Views |
pune city kondhava accident

पुणे
: एका भरधाव व्हॅनिटी व्हॅनने रस्त्यावरील पाच ते सहा वाहनांना धडक दिली. काळजाचा थरकाप उडविणार्‍या या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कोंढवा परिसरातील एनआयबीएम रस्त्यावर रविवारी रात्री घडली. ही व्हॅनिटी व्हॅन नेमकी कोणाची आहे याची चौकशी पोलिसांकडून केली जात असून चालकाला अटक करण्यात आली आहे.

प्रशांत भानुदास घेमुड (वय ३७, रा. बधेनगर, कोंढवा खुर्द) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घेमुड हे त्यांच्या दुचाकीवरुन जात होते. रिक्षाचालक मधू कुवर, रिक्षातील प्रवासी अलिस्टर मर्चंट, मालवाहतूक टेम्पोमधील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख (रा. लेन क्रमांक ३, सय्यदनगर, हडपसर) हे चौघे गंभीर जखमी झाले. एका जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जखमींवर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोंढवा पोलिसांनी बसचालक आरोपी मैनुद्दीन मेहबूब शेख (वय ४२, रा. नाना पेठ, कॅम्प चौक, पुणे) याला अटक केली आहे.

pune city kondhava accident

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर ऑर्किड पॅलेससमोरील उतारावर असलेल्या वाय जंक्शनजवळ एक भरधाव बस आली. या बसचा क्रमांक एमएच १२ एचबी ०२४२ असा आहे. या बसचे ब्रेक निकामी झाले होते. उतारावरून भरधाव खाली आलेल्या या बसची रस्त्यावरील सहा वाहनांना धडक बसली. हा अपघात एवढा भयंकर होता की रस्त्यावरील लोक घाबरुन सैरावैरा पळत सुटले. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांनी सांगितले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.