मविआची भाऊबंदकी

    22-May-2023   
Total Views |
mahavikas aaghadi maharashtra politics

महाराष्ट्राच्या राजकारणात लहान भाऊ-मोठा भाऊ यावरूनच्या चर्चा नवीन नाहीत. यापूर्वीही भाजप-शिवसेनेचे सरकार असताना, कोण किती लहान, कोण किती मोठा यावरून असेच वादविवाद वेळोवेळी रंगले. युती-आघाडीचे राजकारण म्हटले की, ही अशी राजकीय रस्सीखेच ओघाने आलीच. त्यात दोघांत तिसरा आल्याने तर हा गोंधळ अधिक वाढीस लागला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळातही लोकसभा, विधानसभा जागावाटप हा कायमच कुरबुरींचा विषय राहिला. पण, त्यावर कसाबसा तोडगा निघाला. परंतु, यंदा ठाकरेंच्या रुपाने आघाडीची तिघाडी झाल्याने जागावाटपापूर्वीच मविआमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे निर्माण झालेली दिसतात. २०१९ साली जेव्हा मविआचे सरकार अस्तित्वात आले, तेव्हा ती निवडणूक निकालांपश्चात केलेली आघाडी होती. त्यामुळे जागावाटपाचा प्रश्न नसला तरी नंतर खातेवाटप, महामंडळ वाटप, निधीवाटप अशा सगळ्यांच बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमध्ये वरचश्मा राहिला. ठाकरेंची बोळवण मुख्यमंत्रिपदावर करण्यात आली. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची त्यांना मिळाली खरी, पण त्याव्यतिरिक्त अडीच वर्षांत बाकी फारसे काही ठाकरेंच्या वाट्याला आले नाहीच. त्यात आता तर परिस्थिती पूर्णपणे पालटलेली. ठाकरेंची शिवसेना फुटल्याने ते शक्तिहीन ठरले आहेत. ते कितीही उच्चरवाने लोकसभेच्या १८ जागांवर दावा करीत असले तरी त्यांची ‘बारगेनिंग पॉवर’ ही घटलेलीच. त्यामुळे २०१९ सालचे ठाकरे आणि २०२३ची त्यांची, त्यांच्या पक्षाची सद्यस्थिती, यात जमीन-आसमानचा फरक. त्यामुळे संजय राऊत यांनी कितीही जागांवर दावा ठोकला तरी आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेतही त्यांच्या वाट्याला फार काही येणार नाही, हेच खरे. दुसरीकडे राष्ट्रवादीतील पवारांचे राजीनामानाट्य आणि काँग्रेसचा कर्नाटकमधील विजय, यामुळे सध्या लहान-मोठा भाऊ म्हणून कुरबुरी करणार्‍यांचा उत्साह दुणावलेला दिसत असला, तरी तो किती दिवस टिकेल, हे पाहावे लागेल. त्यामुळे शिवसेनेच्या फुटीने महाविकास आघाडीची वज्रमूठ आधीच सैल झाली असून, आता ही आघाडी अखेरच्या घटका मोजत आहे. जसाजशा निवडणुका जवळ येतील, तसतसे दावे-प्रतिदाव्यांचे आघात करत ही आघाडी कायमची विसर्जित होईल, अशीच चिन्हे!

मुफ्तींची भाबडी आशा...

कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाने काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत विरोधकांना आनंदाच्या अगदी उकळ्या फुटल्या. भाजप जसा कर्नाटकमध्ये पराभूत झाला, तशीच स्थिती आपल्या राज्यातही निर्माण व्हावी, म्हणून काहीजण देव पाण्यात ठेवून बसले आहेत. मेहबुबा मुफ्तीही अशाच भाबड्या आशेवर दिवस ढकलत आहेत. कर्नाटकप्रमाणे काश्मीरची जनताही भाजपला नाकारेल आणि आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ, असे मुफ्तींचे दिवास्वप्न. पण, जोपर्यंत राज्यात ‘कलम ३७०’ पुुन्हा लागू होत नाही, तोपर्यंत मी कोणत्याही निवडणुका लढवणार नाही, असेही त्या कर्नाटकमध्ये माध्यमांशी बोलताना सांगून मोकळ्या झाल्या आणि दुसरीकडे राज्यात निवडणुका घेण्याचा मोदी सरकारचा कोणताही मानस नसल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पण, सत्य हेच की, ‘कलम ३७०’ पुन्हा येणे नाही. काश्मीरमध्ये निवडणुका होतीलच. तेव्हा सध्या निवडणुकीला नकार देणार्‍या मेहबुबा मुफ्ती पुन्हा जनतेसमोर गेल्या, तरी त्या पुन्हा मुख्यमंत्रीही होणे नाहीच! मुफ्ती, अब्दुल्ला आणि गांधी घराण्याने काश्मीर खोर्‍याला कायम कसे धार्मिक संघर्षात धुमसते ठेवले आणि काश्मीरचा विकास कसा रोखून धरला, याचा इतिहास साक्षीदार आहेच. पण, आम्ही काश्मीरचे असल्यामुळे खोर्‍याचा विकास फक्त आम्हीच करू शकतो, या अविर्भावात मुफ्ती अजूनही हरवलेल्या दिसतात. पण, ‘कलम ३७०’ हटविल्यापासून काश्मीरचा चेहरामोहराच पूर्णपणे पालटला. ‘जी २०’च्या बैठकीला कालपासून काश्मीरमध्ये शुभारंभही झाला. त्यामुळे एकप्रकारे काश्मीरमध्येच ‘जी २०’ बैठकीचे आयोजन करून भारताने तेथील विकास, प्रगती जगासमोर मांडली आहे. पण, मुफ्तींनी त्याचे स्वागत करण्यापेक्षा, या बैठकीनिमित्त वाढवलेल्या सुरक्षा बंदोबस्तामुळे काश्मिरींना कसा त्रास सहन करावा लागतोय, त्याच्या तक्रारींचा पाढा वाचला. परंतु, आता मुफ्तींनी कितीही आरडाओरड केली तरी सत्य बदलणारे नाही. ‘कलम ३७०’ इतिहासजमा झाले आणि त्याबरोबर काश्मीरमधील घराणेशाहीसुद्धा निकालात निघाली. तेव्हा, मुफ्तींनी उघड्या डोळ्यांनी काश्मीरचा चौफेर विकास आता कबूल करावा. मुफ्तींनीही मोठ्या मनाने जेव्हा कधी काश्मीरमध्ये निवडणुका होतील, तेव्हा जरुर मैदानात उतरावे आणि काश्मिरी त्यांना संधी देतात की नाकारतात, ते पाहावे!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची