जपानला भारतीय भाषांची भुरळ; पुढचे हिंदी साहित्य संमेलन जपानमध्ये भरवण्याची मागणी

22 May 2023 12:42:02

modi mizo 
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी-७ शिखर परिषदेनिमित्त जपान दौऱ्यावर आहेत. यावेळी हिरोशिमा येथे प्रसिद्ध जपानी लेखक डॉ. टॉमीओ मिझोकामी यांनी नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मिझोकामी हे भारतीय भाषांचे चाहते तसेच जाणकार आहेत. त्यांचे हिंदी व पंजाबी भाषांवर प्रभुत्व आहे. यावेळी त्यांनी पुढील हिंदी साहित्य संमेलन जपान मध्ये भरवण्याविषयी मोदींना विनंती केली.
 
प्रा. मिझोकामी हे जपानमध्ये भारतीय भाषा आणि संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी हा सन्मान प्रदान केला होता. त्याबरोबरच उत्तर प्रदेश सरकारने 'हिंदी रत्न' हा पुरस्कार त्यांना दिला होता. 'जागतिक हिंदी परिषद' जपान मध्ये आयोजित करा असे सांगत त्यांनी नरेंद्र मोदी यांचा यथोचित पाहुणचार केला. केवळ जपानचं नव्हे तर अमेरिकेतही त्यांनी भारतीय भाषा आणि संस्कृतीचे बीज रोवले. अमेरिकेत भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी मोहीम चालवली आहे. १९८९ ते १९९० पर्यंत त्यांनी शिकागो विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाला व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून भेट दिली. यादरम्यान त्यांनी पंजाबीही शिकवले.
 
"कोबे या शहरात जन्मल्यामुळे भारतीय भाषांची ओढ लागली." असे म्हणत ते पुढे म्हणाले, "कोबे शहरात भारतीय वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती पाहून भारतीय भाषांची आवड निर्माण झाली. व नेहरूंच्या अलिप्ततावादी चळवळीची भुरळ पडली. त्यातूनच पुढे भारतीय भाष्य आणि संस्कृतीचा चाहता झालो."
Powered By Sangraha 9.0