मुंबईनंतर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील नालेसफाईची केली पाहणी

रस्ते कंत्राटदारावर नोटीसचा बडगा

    22-May-2023
Total Views |
cm eknath shinde in thane

ठाणे
: मुंबईतील नालेसफाईचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी करून प्रशासनाला निर्देश दिले. तर, शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामे व रस्ते उभारणीचा आढावा थेट रस्त्यावर उतरून घेतला. यावेळी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्तांना दिले.

ठाणे शहरासाठी राज्य शासनाकडून ६०५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या अंतर्गत सध्या २८२ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, सरकारी योजनांमधून सुरू असलेली रस्त्यांची कामे, इतर प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी घेतला. यावेळी रस्त्याची कामे करणाऱ्या कंत्राटदाराला तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली.

ठाणे शहरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी करत असताना टिकूजीनी वाडी सर्कल येथे सुरू असलेल्या रस्ताच्या डांबरीकरण कामाची पाहणी करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. यावेळी या कंत्राटदाराने कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने, हॅन्ड ग्लोव्हज, हॅल्मेट इत्यादी दिलेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी याची तातडीने दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. रस्त्यांची कामे होणे हे जितके महत्वाचे आहे तेवढेच ते बनवणारे कामगार सुरक्षित राहणे महत्वाचे असल्याचे त्यांनी या कंत्राटदाराला तात्काळ ही सामुग्री देण्याबाबत खडसावले. तसेच त्यांच्यावर याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांना दिले.दरम्यान, नालेसफाईच्या कामांचीही पाहणी मुख्यमंत्र्यानी केली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.